अहमदनगर(वेबटीम) मुंबईत मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून उडया मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तरूणांची आमदार निलेश लंके यांनी समजूत घ...
अहमदनगर(वेबटीम)
मुंबईत मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून उडया मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या दोघा तरूणांची आमदार निलेश लंके यांनी समजूत घालून, मी तुम्हाला न्याय मिळवून देतो अशी ग्वाही दिल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलवला व दोघांचेही प्राण वाचले. मंगळवारी सायंकाळी पावणेसहा वाजता हा थरार घडला.
विधिमंडळातील कामकाज आटोपल्यानंतर आमदार नीलेश लंके हे मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर ते बाहेर निघाले असता काही पोलिस कर्मचारी व अधिकारी घाईने वरच्या मजल्याकडे जात असल्याचे त्यांनी पाहिले. काहीतरी घडले असल्याचे त्यांनी ताडले व अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आल्यानंतर त्यांना घडलेला प्रकार समजला. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील गच्चीवर दोन तरूण आत्महत्या करण्याच्या तयारीत होते. आ. लंके पोलिसांच्या पुढे जात ते गच्चीवर पोहचले. तेथे जाताच दोन पावले जरी पुढे आले तर आम्ही खाली उडया टाकू अशी धमकी त्यांनी दिली.
आ.लंके हे मी आमदार निलेश लंके आहे माझ्याशी चर्चा करा असे आवाहन ते करीत होते. मात्र त्यांच्यातील अंतर मोठे असल्याने त्यांच्यापर्यंत आवाज पोहचत नव्हता. लंके यांनी एक मोबाईल त्यांच्यापर्यंत पोहचवून मोबाईलवर चर्चा केली. मी आमदार निलेश लंके आहे आपण चर्चा करून त्यातून मार्ग काढू असे सांगितल्यानंतर फक्त आ. लंके यांनी पुढे यावे आम्ही तुमच्याशी चर्चा करतो. हे त्यांनी मान्य केले. लंके त्यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांनी त्यांची समजूत घातली. सबंधित अधिकाऱ्यास फोन लाऊन योग्य न्याय देण्याचा शब्द आ. लंके यांनी दिला. मी तुमचा भाऊ आहे काळजी करू नका असा विश्वास लंके यांनी दिल्यानंतर उडी मारण्यासाठी तयार झालेले दोघेही तेथून मागे सरकले.आ. लंके यांनी दोेघांना सोबत घेत पोलिस अधिकाऱ्यांच्या स्वाधीन केले.
मराठा समाजाचे आरक्षण १६ वरून १३ टक्के झाल्याने त्या दोघांच्या नोकरीच्या संधी गेल्या होत्या.मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी दिवसभर चर्चा करूनही मार्ग न निघाल्याने दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलले होते. मात्र आ. लंके यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे पुढील अनर्थ टळला आहे. आत्महत्या प्रयत्न करणारांपैकी एकाचे नाव युवराज चौहान असल्याची माहीती पुढे आली आहे. दरम्यान या दोघा युवकांपुढे जी अडचण निर्माण झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे आ. लंके यांनी सांगितले. आ.लंके यांच्यासमवेत अशोक घुले, किशोर यादव, दादा दळवी, रोहित घावटे, विकास दगाबाज हे कार्यकर्ते होते.
खूप मोठा शिवसैनिक आहेत...
दरम्यान लंके साहेबांनी चांगलं काम केलं आज, मराठी क्रांतिकाराचा जीव वाचवलाय अशी माहिती एका नेत्याने माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना विधनाभवन परीसरात दिली. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आ.लंके खूप मोठे शिवसैनिक आहेत असे गौरवोद्गार काढले. त्यावर आ.लंके यांनी मोठ्या अभिमानाने त्यांच्या हातातील शिवबंधन धागा दाखविला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत