देवाने रात्र-झोपण्यासाठी आणि दिवस जागण्यासाठी निर्माण केलाय. परंतू कलावंतांचं सगळं उलटं आहे. रात्र जागून काढल्यावर पहाटे जेवण करून प्रवास...
देवाने रात्र-झोपण्यासाठी आणि दिवस जागण्यासाठी निर्माण केलाय. परंतू कलावंतांचं सगळं उलटं आहे. रात्र जागून काढल्यावर पहाटे जेवण करून प्रवास सुरू करायचा आणि दिवसा झोपायचं. धावपळीत कोणी आजारी पडला तरी त्याने भूमिकेसाठी उभेच रहायचे. समोर प्रेक्षकांचे मनोरंजन आणि आत आम्हा कलाकारांची जिवाची घालमेल कायम सुरूच असते. म्हणून कला केवळ मनोरंजनाचा विषय नाही.
कलावंतांनी सादर केलेल्या पात्रांचा इतिहास आणि कलाकाराचे आयुष्य समजून घेण्याचाही तो विषय आहे. अंगात रग आहे तो पर्यंत रंगभूमीवरील अभिनय, वस्तुस्थितीचे कटुसत्य समोर येऊ देत नाही. उतारवयात मात्र समोर आलेले कटुसत्य पेलवत नाही. नशिबाने अंगावर आलेली जवाबदारी आणि नकळत जडलेली व्यसने, कुटुंबाची ससेहोलपट करण्यास पुरेशी असतात. आजपर्यंत कलावंतांना कोणी समजून घेतले का..? अश्या प्रकारचे सवाल अनेक वेळेस समोर येऊन उभे राहतात तेव्हा कळते की आम्ही कलाकार किती कमनशिबी आहोत, पक्ष, संघटना, संस्था, प्रतिष्ठान अनेक ठिकाणी कलाकारांना मोठ्या रुबाबात बोलावले जाते व रसिक श्रोत्यांच मनमुराद मनोरंजन केलं जातं. परंतू या मनोरंजनाच्या मागे कलाकारांची दैनंदिन पोटाची खळगी भरण्याचा विचार चालू असतो, चेहऱ्यावरील हसू आणि हृदयाच्या गाभाऱ्यातील आसू आज पर्यंत कोणी ओळखले का..? स्वार्थी वृत्तीच्या मोहमायांच्या या दुनियेत देशाला व महाराष्ट्राला आपल्या कलेच्या व प्रबोधनाच्या माध्यमातून योग्य दिशा देण्याचे महंत कार्य या बिचाऱ्या कलावंतांनीच केले आहे, रंगमंचावरील राजाच्या महालात वावरता-वावरता गावाकडं झोपडं बांधायचही राहून जातं. आणि शेवटी मात्र त्याच्या आयुष्याचा तमाशा होऊन जातो, आणि कुठेतरी खितपत पडलेला कलाकार समाजाच्या आणि काळाच्या पडद्याआड जातो. शेकडो आणि हजारो रसिकांना मंत्रमुग्ध करणारा कला क्षेत्रातील कलासम्राट या मोहमायेच्या दुनियेत हयात नसतानी कधीतरी एखाद्यावेळेस कोणाला तरी आठवला की त्याची चर्चा नाममात्र रंगते व क्षणार्धात संपते, अश्या कलाकाराच आयुष्य प्रचंड वेदनादायी असते... आज राजकीय, सामाजिक, सण, उत्सव व विविध क्षेत्रात कलाकारांचे योगदान प्रचंड महत्वपूर्ण आहे, त्यांच्या सादरीकरण केलेल्या कलेने तुमच्या नियोजित कार्यक्रमाची उंची वाढते आणि ज्यांच्यामुळे कार्यक्रमाची उंची वाढते शेवटी त्यालाच खितपत सोडले जाते ही शोकांतिका आहे...
म्हणून कोणत्याही कलाकाराला त्याच्या कलेचा योग्य मोबदला देऊन त्याच्या कलेचा, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करा... व कलाकार वाचवा, कलाकार घडवा जेणेकरून कलेप्रती प्रत्येकालाच अभिमान वाटला पाहिजे...
लेखक
हसन एम. सय्यद
(शिवचरित्रकार प्रबोधनकार)
9665226824

कोणत्याही टिप्पण्या नाहीत