राहुरी(वेबटीम) तहसीलदार फसिओद्दीन शेख यांनी लिलावातील वाहनांची माहिती लपवून लिलाव प्रक्रियेत वाहन खरेदी करणाऱ्या काही लोकांची फसवणूक केली. य...
राहुरी(वेबटीम)
तहसीलदार फसिओद्दीन शेख यांनी लिलावातील वाहनांची माहिती लपवून लिलाव प्रक्रियेत वाहन खरेदी करणाऱ्या काही लोकांची फसवणूक केली. या बाबत तहसीलदार फसिओद्दीन शेख व इतर महसूल कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी आज दिनांक ५ सप्टेंबर पासून प्राणांतिक आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
राहुरी येथील आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास नाना साळवे यांनी श्रीरामपूर विभागातील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्याकडे केलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, तहसीलदार फसिओद्दीन शेख तसेच अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांचा लिलाव प्रक्रियेत सहभागी असलेले कर्मचारी तत्कालीन नायब तहसीलदार गणेश तळेकर, लिपिक सुनील भवर व इतर कर्मचाऱ्यांनी संगणमत करून विलास साळवे यांना फसवण्याचे कट कारस्थान करून लिलाव प्रक्रियेमध्ये ४०७ टेम्पो क्रमांक एम. एच. १७ बी. डी. ७८८७ या वाहन लिलावास विलास मोहन साळवे यांनी बोली लावून ३ लाख ६ हजार रूपयांना तो टेम्पो घेतला. परंतु तहसीलदार फसिओद्दीन शेख व इतर कर्मचाऱ्यांनी संगणमत करून त्या वाहनावर चोरोमंडल फायनान्सचे ५ लाख रुपये कर्ज असलेली माहिती लपवून ठेवली आणि विलास साळवे यांची फसवणूक केली. तसेच लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेल्या प्रत्येकाकडून बेकायदेशीर १ हजार रुपये पावती स्वीकारली आहे. लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ५ हजार रुपये डिपॉझिट पावती ही स्वीकारलेली आहे.
पदाचा दुरुपयोग करून तसेच शासकीय कर्तव्य पार पाडताना त्यांनी गैरवर्तन केलेले आहे. तहसीलदार यांनी गौण खनिज वाहतूक करताना जप्त केलेल्या वाहनांच्या लिलाव प्रक्रियेमध्ये वाहनांवर असलेल्या कर्जाबाबत लिलाव घेणाऱ्यांना माहिती दिली नाही आणि ती लपवून फसवणूक केली. त्यांच्या या कृत्यामुळे तहसीलदार व त्यांचे लिलाव प्रक्रियेत सहभागी असलेले कर्मचारी प्रथम दर्शनी दोषी आढळून येत असल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. अशी मागणी अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर यांच्याकडे केली होती. मात्र त्याची दखल न घेतल्याने आज ५ सप्टेंबर २०२२ पासून विलासनाना साळवे यांनी राहुरी पोलीस ठाणे समोर गुन्हा दाखल होणे कामी उपोषण सुरू केले आहे.
या प्रसंगी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, मुस्लिम आघाडी जिल्हाध्यक्ष आयुबभाई पठाण, तालूका उपाध्यक्ष सुनिल चांदणे, महिला आघाडी तालूका अध्यक्षा स्नेहल सांगळे, सिद्धांत सगळगिळे, राॅबर्ट सॅम्युअल, रवि साळवे, समीलभाई शेख, बाळासाहेब पडागळे, दादू साळवे, किरण साळवे, नवीन साळवे, दिपक सांगळे, सुरज साळवे, भूषण साळवे, राजू दाभाडे, रविंद्र शिरसाठ, अरविंद दाभाडे आदि उपस्थित होते.
या उपोषणास शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, साम्राज्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणपत गव्हाणे, अतुल त्रिभुवन आदींनी पाठींबा दिला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत