राहुरी/वेबटीम:- राष्ट्रवादी अपंग सेलचे राज्याचे अध्यक्ष तथा पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय शब्बीरसेठ हाजी नुरमहंमद देशमुख (६...
राहुरी/वेबटीम:-
राष्ट्रवादी अपंग सेलचे राज्याचे अध्यक्ष तथा पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय शब्बीरसेठ हाजी नुरमहंमद देशमुख (६१) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मागिल काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
राहुरी तालुक्यातील मुळ बारागाव नांदूर येथील रहिवासी असलेले व राहुरी खुर्द येथे राहणारे शब्बीरसेठ देशमुख यांच्या निधनाच्या वृत्ताने राजकीय, सामाजिक व शासकयी क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. पुणे व नगर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांची प्रकृती सुधारली होती. ते राहुरी खुर्द येथे घरातच असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माजी खासदार प्रसाद तनपुरे, स्व.शिवाजीराजे गाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरूण तनपुरे, सुधाकर तनपुरे यांच्या खांद्याला खांदा देत त्यांनी राजकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केला होता. राष्ट्रवादीचे नेते खा. पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय असणारे शब्बीरसेठ देशमुख यांनी पक्षाच्या अपंग सेलची भूमिका अत्यंत चोखपणे पार पाडली. जिल्ह्यात अल्पसंख्यांक समाजाचे नेतृत्व करीत असताना त्यांनी सर्वधर्मसमभाव जोपासत बारागाव नांदूर येथे श्री रोकडेश्वर महाराज मंदिर उभारणी केली होती. राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोठी झेप घेतली होती. बारागाव नांदूर गावात रॉकेल दुकान ते पेट्रोल पंप मालकापर्यंत झेप घेत त्यांनी व्यवसायातही घेतलेली उत्तुंग भरारी महत्वाची ठरली.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, बंधू, चुलते, सूना, नातवंडे असा परिवार होत. बारागाव नांदूर येथील कब्रस्थान येथे रात्री ८ वाजता त्यांचा अंत्यविधी संपन्न झाला. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती देत श्रद्धांजली अर्पण केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत