राहुरी (प्रतिनिधी) राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील ग्रामपंचायत सरपंच गायत्री अमोल पेरणे यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यां...
राहुरी (प्रतिनिधी)
राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथील ग्रामपंचायत सरपंच गायत्री अमोल पेरणे यांचे सदस्यत्व जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी रद्द केले आहे. सरकारी जागेवर असलेले अतिक्रमण सिद्ध झाल्याने सदर निर्णय देण्यात आला असून सरकारी जागेवर अतिक्रमण भोवले असून या निकालामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायतची निवडणूक ऑगस्ट २०२२ मध्ये झाली होती. यामध्ये गायत्री अमोल पेरणे विजयी होऊन सरपंच पदी विराजमान झाल्या होत्या. परंतु राहुरी नवीन गावठाण येथील किसन सकृबा पारधे यांनी जानेवारी २०२३ मध्ये याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय अ.नगर यांच्याकडे सरपंच गायत्री अमोल पेरणे यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी गटविकास अधिकारी, राहुरी यांना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे यांनी पाहणी करून अहवाल सादर केला. यामध्ये सरपंच गायत्री अमोल पेरणे व पती अमोल चंद्रभान पेरणे यांनी गट नंबर ६८२ मध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे दिसून आले. तसेच ग्रामपंचायत रेकॉर्डला देखील अतिक्रमण असल्याचे दिसून आले. त्यानुसार शासकीय जागेवर अतिक्रमण सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी सरपंच गायत्री अमोल पेरणे यांचे सरपंच पदासह सदस्यत्व रद्द करत असल्याचे आदेश दिले आहेत. अर्जदाराच्या वतीने ऍड विनय गरुड यांनी कामकाज पाहिले. दरम्यान सदर सरपंच पदासह सदस्यत्व अपात्र करण्याचा निकाल दिल्याने गावात राजकीय खळबळ उडाली आहे.
सदर प्रकरणी जानेवारी २०२३ मध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर सुमारे ७ महिने प्रकरण सुरू होते. मात्र ऐन निकाला वेळी तक्रारदार किसन पारधे यांनी आपली सामनेवाले यांच्याशी महत्वपूर्ण तडजोड झाल्याचे लेखी म्हणने दिले होते मात्र संबंधित प्रकरणी अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाल्याने अर्जदाराच्या या म्हणण्याचा विचार करता येणार नाही असे जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी आदेशात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत