कोळपेवाडी - कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी गोदावरी नदी पात्रातुन होणाऱ्या अवैध वाळु उपशास महसूल विभागाचे अभय मिळत असल्याने वाळू तस्करांना मो...
कोळपेवाडी -
कोपरगाव तालुक्यातील कोळगावथडी गोदावरी नदी पात्रातुन होणाऱ्या अवैध वाळु उपशास महसूल विभागाचे अभय मिळत असल्याने वाळू तस्करांना मोकळे रान मिळत असल्याने वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे.
गोदावरी नदीला काही प्रमाणात पाणी आल्याने बहुतांश गावातील अवैध वाळू उपसा बंद पडला आहे. त्यामुळे अनेक वाळू तस्करांनी आपला मोर्चा कोळगावथडी नदी पात्राकडे वळविल्याने कोळगावचे नदीपात्र उजाड होत आहे. अवैध वाळू उपशास प्रतिबंध आणण्यासाठी कोपरगाव महसूल विभागाने फिरते पथक स्थापन केले आहे. पात्रातून होणाऱ्या अधिकृत उपसाचा लेखा जोखा ठेवण्याचे काम हे पथक करत असते. मात्र हे पथक अवैध वाळू उपशाकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. येथे मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा होता असला तरी कागदोपत्री केवळ १७ केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. अवैध वाळु तस्करांनी दिवस - रात्र वाळुचे उत्खनन करून उपसा केलेली वाळु वनविभागाच्या हद्दीत साठवणूक करुन डंपरद्वारे नाशिक जिल्ह्यात चढ्या भावाने विक्री करण्याचा उद्योग चांगलाच बहरास आला आहे. सांयकाळी व सकाळी कुंभारी - कोळपेवाडी मार्गाने विना क्रमाकांचे वाळुने भरलेले डंपर नाशिक जिल्ह्याकडे मार्गस्थ होताना नागरिक उघड्या डोळ्याने बघत असतांना महसूल व पोलीस प्रशासनास सदर वाहने दिसत नाही का नाहीत? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कोपरगाव महसूल विभागाने काही दिवसांपुर्वी कोळगावथडी शासकीय वनजमिनीच्या हद्दीत याच ठिकाणी दोनशे ते तीनशे ब्रास अवैध साठवणूक केलेला वाळु साठा जप्त करुन तो शासकीय वाळु डेपो सुरेगाव येथे जमा केला होता. महसूल विभागाने पंचनामा करतांना वाळु साठ्याशी संबंधित तस्करांवर वाळु चोरीचा गुन्हा नोंदवत नदी पात्रातुन झालेल्या एकुण अवैध उत्खनाचा दंडाचा कोट्यवधी रुपयाचा बोजा तस्कराच्या मालमत्तेवर होणे अपेक्षित असतांना महसूल विभागाने फक्त वाळु जप्तीचा धरसोड पंचनामा केल्याने अवैध वाळू तस्करांवर महसूल विभागाचा धाकच उरला नसल्याने कोळगावथडी परिसरात वाळु तस्करी चांगलीच फोफावली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत