राहुरी(वेबटीम) नगर मनमाड रस्त्याच्या लगत सीएनजी पाईप तसेच मोबाईल कंपनीच्या केबलसाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी मातीचा ढिगारा तिघा मजुरांच्या ...
राहुरी(वेबटीम)
नगर मनमाड रस्त्याच्या लगत सीएनजी पाईप तसेच मोबाईल कंपनीच्या केबलसाठी सुरू असलेल्या खोदकामावेळी मातीचा ढिगारा तिघा मजुरांच्या अंगावर कोसळला. घटनेत एकाचा मृत्यू तर दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली. आ. प्राजक्त तनपुरे यांना घटनेची माहिती मिळताच धाव घेत त्यांनी जखमींची विचारपूस केली.
नगर मनमाड रस्त्यालगत गेल्या अनेक वर्षांपासून खोदकाम सुरू आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे वेळोवेळी खोदकाम होत असल्याने पूर्वीच खड्डेमय झालेला नगर मनमाड रस्त्याची चाळण झाली आहे. त्यातच राहुरी हद्दीतील धनलक्ष्मी ट्रॅक्टर शोरूम समोर खोदकाम सुरू होते. ४ ऑगस्ट रोजी १ वाजता सीएनजी पाईप लाईन जोडणीसाठी असलेल्या खड्यात मोबाईल वायरिंग जोडणी करीत असतानाच मातीचा ढिगारा तिघांच्या अंगावर कोसळला. यामध्ये गळनिंब (ता.श्रीरामपूर) येथील प्रदिप इंद्रभान भोसले (२७) हा जागीच ठार झाल्याचे समजले. तर आकाश सुरज देवरे रा. खडका फाटा व चिंचाळे येथील दत्तात्रय जालिंदर चितळकर या दोघांना जखमी अवस्थेत खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी माहिती मिळताच आ. प्राजक्त तनपुरे यांनी घटनेची सविस्तर माहित घेत जखमींची भेट घेतली. पोलिस प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करावी. मयत व जखमींना याप्रकरणी न्याय मिळावा असा आदेश पोलिसांना दिला.
घटनेमुळे युवकाचा बळी गेल्याची घटना दुर्देवी असल्याचे मत आ. तनपुरे यांनी व्यक्त केले. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक गिते यांनी घटनास्थळी पथकासह हजेरी देत पंचनामा केला. मृतदेह अहवाल आल्यानंतर याप्रकरणी कारवाई करणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले.
सीएनजी पाईप लाईनसाठी नगर मनमाड रस्त्यालगत सुरू असलेल्या खोदकामामुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या. खोदकाम करणारे ठेकेदाराचा निष्काळजीपणा प्रवाशांसाठी तापदायक असताना मजुरांसाठी जीवघेणा ठरला आहे. पावसाच्या रिमझिम सरी कोसळत असतानाही काम सुरूच असल्याने मातीचे ढिगारे कोसळत आहे. त्यामुळे ठेकेदाराच्या दुर्लक्षितपणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत