देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरण पूरक घरगुती व सा...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरण पूरक घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा आयोजीत करण्यात आलेलेली असून या स्पर्धेत शहरातील नागरिकांनी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी सहभागी होण्याचे आवाहन देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुखाधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसुंधरा अभियान ५.० पर्यावरण पूरक घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत नागरिक व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना प्रवेश विनामुल्य देण्यात येणार आहे. हि स्पर्धा ५० मार्कांची असून यामध्ये पर्यावरण पूरक गणपती मूर्ती (शाडू, शेणाची) आणि प्लास्टिक विरहीत सजावट (गुण १०), सामाजिक संदेश देणारा देखावा / सजावट उदा. सार्वजनिक मंडळ वृक्षारोपण, रक्तदान शिवीर, व्याख्याने, स्पर्धा, पथनाट्य इ. घरगुती गणपती किमान ५ रोपांचे वृक्षारोपण करणे. (गुण १०), पर्यावरण पूरक सामाजिक उपक्रम राबविणे (गुण १०), उत्सव कालावधीतील निर्माल्य व्यवस्थापन, स्वच्छता, पर्यावरणपूरक विसर्जन (गुण १०) वरील प्रमाणे स्पर्धे साठी गुणांकन दिलेले आहे. ही स्पर्धा देवळाली व राहुरी कारखाना परिसरातील नागरिक व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी आहे. घरगुती गणपती स्पर्धेसाठी एक मिनिटाचा व्हिडीओ व विविध बाजूने काढलेले छायाचित्र नगरपरिषदेच्या व्हाटसप क्रमांकावर पाठवणे बंधनकारक आहे. छायाचित्र व विडीयो पाठवण्याची मुदत १२ सप्टेंबर २०२४ पर्यंत राहील स्पर्धेत भाग घेण्यापूर्वी गुगल फॉर्म लिंक भरून देणे बंधनकारक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे परीक्षण १३ व १४ सप्टेंबर रोजी तीन सदस्यांमार्फत केले जाईल.
या समितीमध्ये पत्रकार, सामजिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी सदस्य म्हणून काम करतील परीक्षकांचा व न. पा. प्रशासनाचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानसाठी प्रथम पारितोषिकरक्कम ३३३३ रुपये स्मृती चिन्ह ३३ वृक्ष, द्वितीय पारितोषिक रक्कम २२२२ रुपये स्मृती चिन्ह २२ वृक्ष, तृतीय पारितोषिक रक्कम ११११ रुपये स्मृती चिन्ह ११ वृक्ष व घरगुती गणेशोत्सवासाठी प्रथम पारितोषिक रक्कम ११११ रुपये स्मृती चिन्ह ११ वृक्ष, द्वितीय पारितोषिक रक्कम ७७७ रुपये स्मृती चिन्ह ७ वृक्ष, तृतीय पारितोषिक रक्कम ५५५ रुपये स्मृती चिन्ह ५ वृक्ष आदी बक्षिसे ठेवण्यात आलेली असून या स्पर्धेचा कालावधी ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर असा राहील असे मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी शहर समन्वयक उदय इंगळे मोबाईल क्रमांक ८०५५०१९५६७८ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नगरपरिषदेच्यावतीने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत