नगर : महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धन व पुरातन वारसा जतनासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या शिलेदारांना नगर तालुक्यातील...
नगर : महाराष्ट्रातील गडकिल्ले संवर्धन व पुरातन वारसा जतनासाठी प्रयत्नशील असलेल्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या शिलेदारांना नगर तालुक्यातील अकोळनेर येथे दुर्मिळ दगडी जलचक्रव्यूह शिल्प शोधण्यात यश आले आहे.
शिवदुर्गच्या शिलेदारांनी अकोळनेरच्या वेशी लगत सरदार जाधव वाड्याच्या मागे असलेले गवताने वेढलेले हे दुर्मिळ शिल्पकोडे शोधून येथे स्वच्छता अभियान राबवले. हे प्राचीन शिल्प साडेचार फुट व्यासाच्या व एका अखंड पाषाणात कोरलेले आहे. चौकोनी आकाराच्या या दगडी शिल्पामध्ये समोरासमोर तोंड असणाऱ्या दोन नागांनी एकमेकांना गोलाकार ६ वेटोळे घातल्याचे दिसून येते. भारतात हिमाचल प्रदेशातील राजनौण येथील चक्रव्यूह, मध्यप्रदेशातील महेश्वर येथील चक्रव्यूह तसेच धार जिल्ह्यामध्ये मांडव या प्राचीन शहरातील जहाज महालातील तलावाच्या कडेवर तयार केलेली नागमोडी जलवाहिनी तसेच नीलकांत शिवमंदिर परिसरात चक्राकार प्रकारातील जलचक्रव्यूहाचे अवशेष मिळाले आहेत.
'सापडलेली संरचना भारतातील काही मोजक्या कलाकृतींपैकी एक अशी आहे. महाराष्ट्रात असे सर्पिलाकार चक्रव्यूह मिळण्याची ही पहिलीच वेळ असून ही संरचना काही विशिष्ट उद्देशाने तयार केलेली असावी.' अशी माहिती इतिहास संशोधक व शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी दिली. अकोळनेर या गावात उत्तर मराठेशाहीच्या कारकिर्दीतील बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. येथील पुरातन मंदिरे, बारवा, तसेच गावाच्या वेशीवर पुणे येथील शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने यांना आजवर ६ शिलालेख मिळाले आहेत. या शिलालेखातील नोंदीवरून अकोळनेर गावाचे प्राचीन काळापासून सामाजिक, धार्मिक आणि ऐतिहासिक अधोरेखित होते. त्यामुळे येथील पुरातन अवशेषांवर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.
या शोधकार्यासाठी मारुती वागसकर, प्रदीप भोर व जगन्नाथ भोर यांनी परिश्रम घेतले. तर स्वच्छता मोहिमेसाठी शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे, अजित दळवी, गोरख कडूस, प्रमोद कुलकर्णी, तुषार चौधरी, प्रणव गलांडे, अमोल बडे, सचिन भोसले, अक्षय ओहळ, सागर घाडगे, निरंजन दळवी यांनी सहभाग नोंदवला.
महाराष्ट्रातील पहिलीच संरचना
'सापडलेली संरचना भारतातील काही मोजक्या कलाकृतींपैकी एक अशी आहे. महाराष्ट्रात असे सर्पिलाकार चक्रव्यूह मिळण्याची ही पहिलीच वेळ असून ही संरचना काही विशिष्ट उद्देशाने तयार केलेली असावी.' अशी माहिती इतिहास संशोधक व शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी दिली.
सदरची संरचना बनवण्यामागे पाणी व्यवस्थापन, पाण्याचे शुद्धीकरण, तीर्थक्षेत्र स्थळावर लोकांचे लक्ष केंद्रित करणे किंवा मनाच्या एकाग्रतेसाठी सुद्धा केला गेला शकतो. या शिल्पाचा कालखंड ठरवण्यासाठी या परिसरातील सांस्कृतिक, सामाजिक, व राजकीय बदलांचा तसेच प्राचीन पौराणिक वास्तूंचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
- सचिन पाटील,
चक्रव्यूह संरचना अभ्यासक, डेक्कन कॉलेज पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत