देवळाली प्रवरा/वेबटीम:- यंदा भरपूर पाऊस होऊन देखील महावितरण कंपनीने देवळाली प्रवरा परिसरात अचानकपणे रात्रीचे भारनियमन सुरू केले आहे. हे भारन...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
यंदा भरपूर पाऊस होऊन देखील महावितरण कंपनीने देवळाली प्रवरा परिसरात अचानकपणे रात्रीचे भारनियमन सुरू केले आहे. हे भारनियमन महावितरणने त्वरीत बंद करावे अन्यथा याबाबत महावितरण विरुध्द तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी दिला आहे.
संसारे यांनी सांगितले की, कुठलीही पूर्व सूचना न देता महावितरणने अचानकपणे देवळाली प्रवरा परिसरात रात्रीचे भारनियमन सुरू केले आहे. एक तर सध्या बिबट्यासह परिसरात जंगली श्वापदांचा मोठ्याप्रमाणात वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिवितिला धोका निर्माण झाला आहे. बिबट्याने अनेक नागरिकांवर हल्ले करून त्यांना गंभीर दुखापत केली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या गोठ्यातून गायीच्या कालवडी, बोकड, कोंबड्या यांचा फडशा पाडल्याच्या घटना रोज घडत असताना महावितरणने अचानकपणे भारनियमन सुरू केले आहे. देवळाली प्रवरा परिसर हा वाड्यावस्त्यांवर विखुरलेला परिसर आहे. याठिकाणी जनता मोठ्याप्रमाणात वाड्यावस्त्यांवर राहत असल्याने या जनतेच्या सुरक्षिततेसाठी रात्री परिसरात वीज असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यातच सध्या परिसरात चोरीचे सत्र देखील सुरू झाले असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना महावितरणने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. याबाबत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरीत निर्णय घेऊन रात्रीचे सुरु केलेले भारनियमन त्वरीत बंद करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संसारे यांनी दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत