श्रीरामपूर/वेबटीम:- विधानसभा निवडणुकीसाठी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू कानडे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी न दिल्...
श्रीरामपूर/वेबटीम:-
विधानसभा निवडणुकीसाठी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार लहू कानडे यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी न दिल्याने शेतकरी कष्टकरी व्यापारी महिला यांच्यासह सर्व शहरातून नाराजीचा सूर उमटत आहे. आ. कानडे यांनी माघार न घेता निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा केली जात आहे. दरम्यान, उमेदवारी नाकारल्याने काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आ. कानडे समर्थक व काँग्रेस कार्यकर्ते जोमाने तयारीला लागले होते. काँग्रेस पक्षाच्या पहिल्या उमेदवारी यादीत आ. कानडे यांचे नाव आले नाही. दुसऱ्या यादीत त्यांना डावलण्यात आले. ज्यांची दुकाने बंद पडली, त्यांच्या कटकारस्थानामुळे दिल्लीस्थित नेत्यांनी आ. कानडे यांच्यासारख्या पक्षनिष्ठ व प्रामाणिक नेत्याला डावलून विश्वासघात केल्याची भावना काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात असून या विश्वासघातकी कटकारस्थानामुळे काँग्रेस पदाधिकारी पदाचे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांबरोबरच विधानसभा मतदारसंघातील श्रीरामपूर राहुरी तालुक्यातील 32 गावातील शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला तसेच सर्वसामान्य जनतेतही नाराजीचा सूर व्यक्त होत आहे, आ. कानडे यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली. काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाले असताना आ. कानडे यांनी पक्ष संघटना वाढवून काँग्रेस पक्षाला बळकटी दिली. काँग्रेस पक्षाशी प्रामाणिक राहून पक्षाचा विचार सर्वसामान्य पर्यंत पोहोचविला. अशा प्रामाणिक नेत्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली नाही. काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली असली तरी त्यांनी न डगमगता निवडणुकीला सामोरे जावे, आ. कानडे यांनी कुठल्याही पक्षातून अथवा अपक्ष निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत