देववल्ली देवांची आळी तथा देवळाली प्रवरा ह्या पुण्य भूमीच्या समृद्ध समाजजीवनाच्या विकासात अनेक रूढी परंपरा उपासना तसेच ग्रामदैवत कुलदैवातांचा...
देववल्ली देवांची आळी तथा देवळाली प्रवरा ह्या पुण्य भूमीच्या समृद्ध समाजजीवनाच्या विकासात अनेक रूढी परंपरा उपासना तसेच ग्रामदैवत कुलदैवातांचा भक्ती आराधनेचा सहभाग मोठा राहिलेला आहे. महाराष्ट्र,कर्नाटक,आंध्र, मध्यप्रदेशातील कोट्यावधी भाविकांचे कुलदैवत श्री. म्हाळसा कांत मल्हारी म्हणजे श्री खंडोबा दैवताचे एक जागृत स्थान म्हणून देवळाली प्रवरा येथील पुरातन अशा श्री. खंडोबाचा समावेश होतो. श्री. खंडोबा महाराष्टाचे कुलदैवत आहे. श्री. क्षेत्र जेजुरी (पुणे), श्री क्षेत्र पाली (सातारा) मल्हारी मार्तंड खंडोबारायाची मुख्य स्थान म्हणून सर्वज्ञात आहेत. फार पुरातन काळात म्हणजे श्री. विष्णूंच्या वामन अवताराच्या वेळी भारत वर्षात बळी राज्य होते. महाराष्ट्र, कर्नाटक व मध्यप्रदेशाचे सोयीनुसार आठ खंड करुण येथील प्रजा रक्षण-संगोपन आदीसाठी बळी राजाने श्री. खंडोबाची प्राण प्रतिष्ठा प्रतीक्षा केली त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक क्षेत्रे श्री खंडोबा देवाची स्थाने म्हणून संबोधली जातात. या तीर्थक्षेत्रामध्ये देवळाली प्रवराचा सामावेश आहे.
देवळाली प्रवरा क्षेत्राच्या पंचक्रोशातील सर्व नागरिक आपल्या कुठल्याही कार्याचा शुभारंभ करतांना श्री गणेशा समवेत श्री खंडोबा देवास वंदन करुण प्रार्थना करतात हा भाग शेतवाडीने संपन्न असल्याने ऊस लागवड धान्यांची पेरणी रोपांची लागण काढणी आदी प्रसंगी सर्व शेतकरी या दैवताची पूजा करतात श्री खंडोबा देवाच्या कृपेमुळे देवळाली प्रवरा पंच क्रोषित दुष्काळ पडत नाही. रोगराईची साथ येत नाही. किरकोळ अपवाद वगळता मोठ्या जबरी चोऱ्या किवा दरोडे पडत नाहीत. मनुष्य वधासारखे गुन्हे घडत नाहीत अशी येथील सर्व अबालवृद्धांची श्रद्धा आहे. कारण पिढ्यानपिढ्या सर्वांची प्रचीती आली आहे. वार्धक्य आजारपण आर्थिक अडचणी किवा अन्य कारणामुळे श्री क्षेत्र जेजुरी किवा पाली येथे जाऊ न शकणारे अनेक भाविक येथे दर्शनास येतात. देवळाली पंचकोशीतील माहेर वशिनी आपल्या बाळाला घेऊन दर्शनास आवर्जून येतात. माघी पौर्णिमा दांडी पुनवेस देवळाली प्रवरा येथे मोठा यात्रोत्सव साजरा होतो.पंच क्रोशातील शेतकरी, शेतमजूर नव्या धान्याची पुरणपोळी नैवद्य भावनेने अर्पण करतात. नवदापत्य संततीप्राप्तीसाठी या देवाची आराधना करतात म्हणून नवसाचा खंडोबा म्हणून त्याची ओळख आहे.
दरवर्षी माघी पौर्णिमेच्या यात्रोत्सवाच्या वेळी नगर, नाशिक, औरंगाबाद, पुणे, बीड, जिल्ह्यातील अनेक लोककलावंत, बहुरूपी श्री खंडोबा देवाचे जागरण करणारे वाघ्या मुरळीची पथके हजेरी लावतात. संपूर्ण देवळाली प्रवरा शहरात प्रति जेजुरी अवतरते या यात्रेनिमित्त होणारा कुस्त्यांचा हंगामा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. मल्हार केसरी मानाची गदा जिंकण्यासाठी मल्लामध्ये प्रचंड उत्सुकता असते. महाराष्ट्राची लोककला म्हणून मान्यता पावलेल्या लोकनाटयाचे फड न चुकता येतात आणि भंडारा घेऊन खेळ साजरा करतात.
अजित सर्जेराव कदम
मो-9860014441
कोणत्याही टिप्पण्या नाहीत