जामखेड(अमृत कारंडे) महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व न्यू आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमा...
जामखेड(अमृत कारंडे)
महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना व न्यू आर्टस्, कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज, शेवगाव, जिल्हा अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिनांक १ व २ फेब्रुवारी २०२५ रोजी पार पडलेल्या ३७ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनामध्ये, जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील पर्यावरणप्रेमी, निसर्ग अभ्यासक, छायाचित्रकार, रणजित रावसाहेब राऊत यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ प्रा. डॉ. प्रवीण सप्तर्षी यांच्या हस्ते झाले. यावेळी निसर्ग अभ्यासक व जागतिक वन्यजीव छायाचित्रकार श्री. बैजू पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, कार्यवाह डॉ. गजानन वाघ, संघटक डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, स्वागताध्यक्ष बापूसाहेब भोसले व पर्यावरण तज्ज्ञ पोपटराव खोसे यांनीही संमेलनात महत्त्वपूर्ण विचार मांडले.
‘पाणथळी आणि पाणपक्षी’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या संमेलनात रणजित राऊत यांनी पक्षीसंवर्धन, जैवविविधता व निसर्ग संवर्धनाची आवश्यकता, पाणथळी आणि पाणपक्ष्यांचे जैवविविधतेतील महत्त्व या विषयी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रवीण सप्तर्षी, निसर्ग अभ्यासक व जागतिक वन्यजीव छायाचित्रकार श्री. बैजू पाटील यांच्या सोबत चर्चा केली. पक्षी निरीक्षण व छायाचित्रण तंत्राविषयी त्यांनी माहिती घेतली, स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी स्थानिक सहभाग वाढवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा केली तसेच दिनांक २ फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळी दिनानिमित्त महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना आयोजित जायकवाडी पक्षी अभयारण्य पैठण येथील पक्षिनिरिक्षण सहली मध्ये सक्रीय सहभाग नोंदवला.
संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या दोन दिवसीय संमेलनात महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून विद्यार्थी, पक्षीप्रेमी, पक्षीमित्र व संशोधक यांचा मोठा सहभाग दिसून आला. रणजित राऊत यांच्या या सहभागामुळे, पक्षीमित्र, जैवविविधता अभ्यासक व पर्यावरणप्रेमींमध्ये उत्साह निर्माण झाला असून, त्यांच्या संशोधनपर दृष्टिकोनाची उपस्थितांनी प्रशंसा केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत