राहुरी(वेबटीम) नगर-मनमाड महामार्गावरील रस्त्याच्या कामात सुरू असलेली दिरंगाई, निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे या महामा...
राहुरी(वेबटीम)
नगर-मनमाड महामार्गावरील रस्त्याच्या कामात सुरू असलेली दिरंगाई, निकृष्ट दर्जाचे काम आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या काही दिवसांत अनेक निरपराध प्रवाशांचा जीव या महामार्गाने घेतला असून, नागरिकांनी ठेकेदार व त्याला अभय देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली होती. मात्र, जबाबदारांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्यामुळे प्रवासी जनता व स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, “जे दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचे गुन्हे दाखल व्हायला हवेत, मात्र उलट सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे.”
नगर मनमाड महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये अनेक कुटुंबातील कर्ते पुरुष मृत्युमुखी पडले आहेत. अनेकांच्या संसारावर उपजीविकेचे संकट ओढवले आहे. अशा दु:खद प्रसंगात जिल्हाधिकाऱ्यांनी या कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांच्या वेदना जाणून घेणे अपेक्षित होते. त्यांच्या जखमा समजून घेऊन आर्थिक व मानसिक आधार देणे प्रशासनाचे कर्तव्य होते.
परंतु, प्रशासनाकडून असा कोणताही पुढाकार न दाखवता उलट आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, “आम्ही रस्त्यावर उतरलो कारण सर्वसामान्य कुटूंबातील नागरिकांचे जीव धोक्यात आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वारंवार आवाज उठवूनही ठोस उपाय होत नाहीत. जीव वाचवण्यासाठी रस्ता दुरुस्त व्हावा, हीच आमची मागणी आहे.”
राहुरी फॅक्टरी येथील आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यामुळे जनतेमध्ये “सरकार दोषींना वाचवत असून जनतेवर कारवाई करत आहे” अशी भावना बळावली आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास जनतेचा संताप उफाळून मोठ्या आंदोलनाचे रूप घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत