ताहाराबाद (वार्ताहर ) राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील डोंगराळ- पठारभाग कडधान्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या ताहाराबाद मंडळात दोन दिवसाच्या ...
ताहाराबाद (वार्ताहर)
राहुरी तालुक्यातील पश्चिमेकडील डोंगराळ- पठारभाग कडधान्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या ताहाराबाद मंडळात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर काल पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र पिके पाण्याखाली गेली असून शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ताहाराबाद मंडळात मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून ओढे-नाले तुडुंब भरून होऊ लागले आहेत. श्री संत कवी महिपती महाराज मंदिर परिसरातील तलाव भरून सांड वाहत आहे.सर्वत्र शेतात पाणी साचल्याने काढणीला आलेली पिके पाण्यामुळे काढता येईना. ताहाराबाद, गाडकवाडी, बेलकरवाडी, वाबळेवाडी व वरशिंदे येथील शेतकऱ्यांचा काढलेला लाल कांदा संपूर्ण सडून गेला आहे. तर काही कांदा काढण्याचा शिल्लक आहे. तो पूर्णपणे पाण्यात आहे. पोळ कांद्याच्या लागणी संपूर्णपणे पाण्यात आहेत.सोयाबीन, भुईमूग, उलगा, मठ आदीं कडधान पिकाची नासाडी झाली आहे. शेतात पाणी असल्याने शेतमजूर कामाला येत नाही. जे मजूर तयार होतात ते काहीही मजूरी सांगतात. त्यामुळे शेतकरी वर्गाची आणखी डोकेदु:खी वाढली आहे. नफा- तोटा एक झाल्यामुळे कडधान्याची शेती संपुष्टात येत आहे.
भारत हा कृषी आणि ऋषींचा देश आहे. कृषीप्रधान देशात बळीराजा मोठ्या संकटात असून फार दुःखी -कष्टी आहे.गेल्या आठवड्यातील जोरदार पावसाने हातबल झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताबरोबरच आता त्यांच्या डोळ्यातही पाणी दिसू लागले आहे. संपूर्ण पितृपक्ष, नवरात्रात वरूणराजाने हाहाःकार केला आहे. पुढे दसरा -दिपावळी सण आहेत. बळीराजा मोठ्या संकटात आहे. जवान आणि किसान ही देशाच्या विकासरथाची दोन चाके आहेत. त्यामुळे बळीराजा अडचणीत असल्याने राष्ट्रही अडचणीत असते. मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी खूप चिंतेत आहे. बळीराजाचे नेत्र शासनाच्या मदतीकडे टक लावून पाहत आहे. राजा उदार होऊन शेतकऱ्यांच्या पदरात काय देतो, त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
महाराष्ट्रात ओला दुष्काळ झाला आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. परंतु राज्यकर्ते फक्त दौऱ्यावर -दौरे करत आहे. एकही नेता शेतकऱ्यांसाठी एकही घोषणा करत नाही, हे दुर्दैव आहे. राज्यकर्त्यांच्या एकूण दौऱ्याचा खर्च किती होतो, सांगता येत नाही. परंतु हा विनाकारण खर्च शासनाच्या तिजोरीवर पडत आहे. शेतकरी पांडुरंगाला प्रार्थना करत आहे, राज्यकर्त्यांना सद्सदविवेक बुद्धी देऊन राजकारण न करता शेतकऱ्यांच्या पदरात भरीव मदत द्यावी. तेव्हाच शेतकऱ्यांच्या नेत्राच्या कडा पुसल्या जातील व शेतकरी समाधानी होईल.
बाप पोट भरून देईना तर आई भीक मागून देईना, अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. ताहाराबाद मंडळात खरीप पिकासाठी सुरुवातीला वरूणराजाने पाठ फिरविली,तर आता अतिवृष्टीने आलेली पिके पाण्याखाली गेली. काढलेल्या मालाला भाव नाही.त्यामुळे शेतकरी वर्ग खूप संकटात आहे. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने भरीव मदत करावी.
जालिंदर मुंढे, उपसरपंच ताहाराबाद.
शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून गावच्या ८ प्रमाणे सर्व शेतकऱ्यांना तात्काळ भरीव मदत करावी. कोणत्याही प्रकारे निकष न लावता, प्रशासनाने शेतकऱ्यांना सहकार्य करावे. तसा आदेशही पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.
नारायण झावरे, माजी सरपंच ताहाराबाद.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत