अहिल्यानगर/वेबटीम:- दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर येथे बहुजन समाज पक्षाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षा ब...
अहिल्यानगर/वेबटीम:-
दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ रोजी अहिल्यानगर येथे बहुजन समाज पक्षाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षा बहन कुमारी मायावती यांच्या आदेशानुसार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संभाव्य उमेदवारांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत राहुरी तालुक्यातील राहुरी आणि देवळाली प्रवरा या दोन शहरांचा सखोल अभ्यास करून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अंतिम निर्णय घेतला.
या बैठकीत देवळाली प्रवरा शहरातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दोंदे यांच्या पत्नी सौ. अश्विनी चंद्रकांत दोंदे यांना बहुजन समाज पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. या घोषणेनंतर देवळाली प्रवरासह परिसरात कार्यकर्त्यांनी मोठा उत्साह व्यक्त करत आतषबाजी आणि जल्लोष साजरा केला.
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सौ. अश्विनी दोंदे यांचा गौरव करत त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून, येणाऱ्या काळात देवळाली प्रवरा नगरपालिकेत बहुजन समाज पक्षाची सत्ता स्थापन होईल अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पक्षाच्या वाढत्या जनाधारामुळे आणि नव्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पक्षप्रवेशामुळे पक्षाचे बळ अधिक वाढले आहे.
या वेळी चंद्रकांत दोंदे यांनी सांगितले की, “बहुजन समाज पक्ष सर्व समाजघटकांना समान संधी देतो. जो कोणी इच्छुक उमेदवार असेल, त्याने आमच्याशी संपर्क साधावा. येथे जात-पात न पाहता गरीब आणि सामान्य माणसाला प्रतिनिधित्वाची संधी दिली जाईल,” असे ते म्हणाले.
या बैठकीस राहुरी व देवळाली प्रवरा परिसरातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत