अहिल्यानगर(वेबटीम) अहिल्यानगर जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिला नागरिकांविरोधात जिल्हा पोलिसांनी कायद्याच्या च...
अहिल्यानगर(वेबटीम)
अहिल्यानगर जिल्ह्यात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिला नागरिकांविरोधात जिल्हा पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहून कडक व निर्णायक हद्दपार कारवाई केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखेमार्फत राबविण्यात आली.
भारतामध्ये कोणतीही वैध ओळखपत्रे अथवा प्रवास कागदपत्रे नसताना वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी महिला नागरिकांची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीत त्या महिलांनी बेकायदेशीररीत्या भारतात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्याविरोधात Foreigners Act 1946 व Passport Act 1920 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
या प्रकरणी संबंधित महिलांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना हद्दपार (Deportation) करण्याचे आदेश दिले. न्यायालयीन आदेशानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पोलिस संरक्षणात, केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तसेच संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत त्यांना बांगलादेशात सुरक्षितपणे हद्दपार करण्यात आले.
या संपूर्ण कारवाईचे प्रत्यक्ष नियोजन व अंमलबजावणी श्री. धनंजय जाधव, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मानवी हक्कांचे पूर्ण पालन करण्यात आले.
अहिल्यानगर जिल्हा पोलिस दलाच्या या प्रभावी कारवाईमुळे जिल्ह्यात बेकायदेशीर घुसखोरीला आळा बसला असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याचा ठाम संदेश देण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत