छत्रपती संभाजीनगर फायनान्स कंपनी कर्मचाऱ्यांकडून सतत धमक्या व मानसिक त्रास दिल्यामुळे एका तरुणीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधितांव...
छत्रपती संभाजीनगर
फायनान्स कंपनी कर्मचाऱ्यांकडून सतत धमक्या व मानसिक त्रास दिल्यामुळे एका तरुणीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित कुटुंबीयांनी केली आहे. याबाबत जवाहर नगर पोलिस स्टेशन येथे तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
गीतांजली अपार्टमेंट, उल्कानगरी येथे राहणाऱ्या सविता योगेश घोडके व योगेश प्रकाश घोडके यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मागील २० ते २५ दिवसांपासून एल.अँड टी फायनान्सचे अधिकारी असल्याचे सांगणारे धनेश्वर तिवले, शंकर काळे व त्यांच्यासोबत असलेले काही जण वारंवार घरी येऊन कुटुंबीयांना धमकावत होते. कर्जाच्या कारणावरून घरासमोर गोंधळ घालणे, रस्त्यात अडवून शिवीगाळ करणे तसेच मालमत्ता जप्त करण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, २३ व २४ जानेवारी रोजीही काही जणांनी घरासमोर येऊन मोठ्याने बोलत धमकावले. या प्रकारामुळे घरातील मुलगी अत्यंत मानसिक तणावाखाली होती. दरम्यान २४ जानेवारी रोजी ती घरी आल्यानंतर अचानक बेशुद्ध पडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित व्यक्तींनी दिलेल्या धमक्या व मानसिक छळामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर तत्काळ गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारदारांनी केली. जवळपास दीड महिने उलटूनही कुठलीही दखल न घेतल्याने कुटूंब अस्वस्थ झाले असून जवाहर नगर पोलिसांनी दखल न घेतल्यास उपोषणाचा पावित्रा घोडके कुटूंबीय स्वीकारणार असल्याचे समजते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत