राहुरी(वेबटीम) राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली असून निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत, निर्भय, निष्पक्ष...
राहुरी(वेबटीम)
राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली असून निवडणूक प्रक्रिया शांततेत, सुरळीत, निर्भय, निष्पक्ष आणि पारदर्शी वातावरणात पार पडावी यासाठी आवश्यक यंत्रणा कार्यरत झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून विविध प्रकारचे निरीक्षक नियुक्त केले जातात. यामध्ये जनरल (सर्वसाधारण), एक्सपेंडिचर (खर्च) आणि पोलीस अशा तीन प्रकारच्या निरीक्षकांचा समावेश असतो.
याच अनुषंगाने निवडणूक निरीक्षक (पोलीस) म्हणून आयपीएस अधिकारी ऋतुराज रवी (मेघालय कॅडर) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे आज सकाळी अहिल्यानगर जिल्ह्यात आगमन झाले आहे. उर्वरित जनरल व खर्च निरीक्षकांचेही आगमन आज-उद्या अपेक्षित आहे.
राहुरी पोटनिवडणुकीदरम्यान नागरिक, मतदार किंवा राजकीय पक्षांना काही तक्रारी अथवा सूचना असल्यास त्यांनी निवडणूक निरीक्षकांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी 9209603386 हा संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच निरीक्षक दररोज सकाळी 11 वाजता निरीक्षण बंगला, व्हीआयपी रेस्ट हाऊस, संभाजीनगर रोड, अहिल्यानगर येथे नागरिकांना भेटणार आहेत.
दरम्यान, ऋतुराज रवी हे लवकरच राहुरी मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणार असून मतदान केंद्रे, शासकीय इमारती, एसएसटी व फ्लाईंग स्कॉड यांना भेट देण्याची शक्यता आहे.
2013 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले ऋतुराज रवी यांनी मेघालयातील पूर्व खासी हिल्स भागात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तसेच शिलॉंग येथे त्यांनी प्रभावी ट्रॅफिक व्यवस्थापन आणि कडक अंमलबजावणीमुळे विशेष लोकप्रियता मिळवली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत