ताहाराबाद (वार्ताहर) प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र ताहाराबादच्या बेलकरवाडी येथे भरलेल्या ६० व्या फिरत्या नारळी अखंड हरिनाम...
ताहाराबाद (वार्ताहर)
प्रतिपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र ताहाराबादच्या बेलकरवाडी येथे भरलेल्या ६० व्या फिरत्या नारळी अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात सांगता झाली. “गोपाला-गोपाला”, “ज्ञानोबा-तुकाराम” आणि श्री संत कवी महिपती महाराजांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या सप्ताहात लाखो भाविकांनी हजेरी लावत समाधी स्थळाचे दर्शन घेतले. भगव्या पताका, हरिनामाचा अखंड गजर आणि वैष्णवांच्या मेळ्यामुळे बेलकरवाडी क्षेत्र भक्तीरसात न्हाऊन निघाले होते. वरुणराजानेही मोकळीक दिल्याने यंदा भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला.
श्री संत कवी महिपती महाराज पायी दिंडी सोहळ्याचे उपाध्यक्ष महंत बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे काल्याचे कीर्तन विशेष आकर्षण ठरले. त्यांनी कीर्तनातून भगवंताच्या विविध लीला सांगत भाविकांना मंत्रमुग्ध केले. देवस्थानचा सर्वांगीण विकास भाविकांच्या सहकार्यामुळेच होत असल्याचे सांगत विकासकामात सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
बेलकरवाडीच्या माळरानावर भरलेल्या या सप्ताहात ज्ञानदान, अन्नदान आणि महाप्रसादाचा महायज्ञ पार पडला. दुष्काळी पट्ट्यातील क्षेत्र असूनही मोठ्या प्रमाणात अन्नदान व ज्ञानदान झाल्याने प्रत्येक भाविक तृप्त होऊन परतला.
यावेळी संत कवी महिपती महाराजांच्या साहित्यसेवेचा गौरव करत कांबळे महाराज म्हणाले की, महिपती महाराज नसते तर संतांची चरित्रे समाजापर्यंत पोहोचली नसती. त्यांनी आपल्या लेखणीतून संत साहित्याचा अमृतप्रवाह समाजाला दिला आणि वारकरी संप्रदायाला मोठी दिशा दिली.
द्वादशीच्या पर्वणीनिमित्त काल्याच्या कीर्तनानंतर नयनरम्य दहीहंडी सोहळा पार पडला. संत-महंत, देवस्थान विश्वस्त, ग्रामस्थ आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेलकरवाडी ग्रामस्थांनी सप्ताहाचे उत्कृष्ट नियोजन केले. महाप्रसादाने सप्ताहाची भक्तिमय सांगता झाली.
चौकट :
“ताहाराबाद क्षेत्र ही दक्षिण काशी असून येथील मातीचा कणकण पवित्र आहे. येथे साक्षात पांडुरंग येतात, ही मोठी लीला आहे. देवस्थान ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गात समाविष्ट करण्यासाठी समिती प्रयत्नशील आहे. पुढील वर्षाच्या सप्ताहाचे नारळ पांडुरंग महोत्सवात दिले जाणार आहेत.”
— मठाधिपती अर्जुन महाराज तनपुरे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत