देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्...
देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, जनगणना प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
चार्ज अधिकारी, मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील आहेत. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी जनगणनेचे राष्ट्रीय महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचा पाया आहे. शासनाच्या विविध योजना, निधीचे नियोजन, तसेच सामाजिक व आर्थिक धोरणांची आखणी ही जनगणनेच्या अचूक आकडेवारीवर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याने ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि दक्षतेने पार पाडावी.” त्यांनी पुढे डिजिटल पद्धतीने होणाऱ्या जनगणनेची माहिती देत तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले.
या प्रशिक्षणासाठी प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी व माध्यमिक शिक्षक सचिन निमसे यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी जनगणना प्रक्रियेतील विविध टप्पे, माहिती संकलनाच्या पद्धती, फॉर्म भरण्याचे नियम, तसेच प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांच्या सादरीकरणामुळे उपस्थितांना जनगणनेची संपूर्ण प्रक्रिया स्पष्ट झाली.
यावेळी प्रशासकीय अधिकारी दीपक जग्रवाल यांचीही उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वसुली विभाग प्रमुख रामदास म्हस्के यांनी उपस्थितांचे स्वागत केले व प्रशिक्षणाच्या उद्देशाबद्दल थोडक्यात माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी आभार प्रदर्शन करत सर्व अधिकारी, प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.या प्रशिक्षणामुळे जनगणना कार्य अधिक प्रभावी, अचूक आणि सुव्यवस्थित रितीने पार पाडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
यावेळी जनगणना विभागाचे भूषण नवाल, वैभव ठोबरे सागर होले, गौरव शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत