राहुरी (प्रतिनिधी) स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२६ उत्साहात पार पडला. या सोहळ्य...
राहुरी (प्रतिनिधी)
स्वराज्य सरपंच सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सन्मान सोहळा २०२६ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे गावचे सरपंच सुधीर कारभारी झांबरे यांना प्रतिष्ठेचा ‘आदर्श सरपंच’ पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
अहिल्यानगर येथील माऊली संकुल सभागृह, सावेडी रोड येथे रविवारी ६ एप्रिल रोजी हा भव्य सोहळा संपन्न झाला. राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात गावपातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सरपंचांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श सरपंच व राष्ट्रपती पुरस्कार विजेते भास्करराव पेरे पाटील, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख, तसेच सरपंच संघटनेचे नेते बाबासाहेब पावसे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते सुधीर झांबरे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
चिंचविहिरे गावात ग्रामविकास, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या सन्मानामुळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, परिसरातून श्री. झांबरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत