राहुरी(वेबटीम ) राहुरी तालुक्यातील कणगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय व अ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील कणगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना ना. आठवले यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करत वर्ग २ च्या जमिनीवर शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यासाठी शासनस्तरावर विशेष पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले.
ते म्हणाले की, अनेक शेतकरी वर्ग २ च्या जमिनीमुळे बँक कर्जापासून वंचित राहतात. त्यामुळे शेती विकासासाठी आवश्यक आर्थिक मदत मिळण्यात अडचणी निर्माण होतात. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे सकारात्मक भूमिका मांडण्यात येईल. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष व केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने शेतकरी, गरीब, दलित, मागासवर्गीय आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक लोककल्याणकारी योजना राबवल्या असल्याचे सांगितले. देशाच्या विकासाबरोबर सामाजिक न्याय टिकवून ठेवण्याचे काम केंद्र सरकार करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे स्मरण करत शिक्षण, संघटन आणि संघर्षाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. पुतळा उभारणीमुळे परिसरातील युवकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
प्रास्ताविक करताना आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी सदर कार्यक्रमाच्या आयोजना मागील भूमिका तसेच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून जनतेसाठी मोठ्या प्रमाणात कामे होत असल्याचे समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमास सीमाताई आठवले, श्रीकांत भालेराव, काकासाहेब खंबाळकर, विजय वाघचौरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, तालुका अध्यक्ष विलास साळवे, अशोक गायकवाड, सरपंच सर्जेराव घाडगे, भीमा बागुल, सुनील साळवे, महेश भनगडे, अंकुश भैलुमे, प्रवीण लोखंडे, गोविंद दिवे, प्रदीप बनसोडे, अमित काळे, राजाभाऊ कापसे, सुनील शिरसाठ, सुशील धायजे, आशिष शेळके, अनिल ननवरे, करण कोळगे, नगरसेवक दासू पठारे, बाबा राजगुरू, भाऊसाहेब पगारे, राजू उबाळे, राजू जगताप, कुमार भिंगारे, सुनील चांदणे, अमोल भनगडे, रविंद्र म्हसे, विनीत धसाळ, सिताराम दिवे, पोपट दिवे, नगरसेविका सुनिताताई थोरात, सीमा बोरुडे, स्नेहल दिवे, छायाताई दुशिंग, संदीप घाडगे, बाबा गाढे, सुयोग नालकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा नागरिकांच्या वतीने नागरिक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते. संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण असून कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे यांनी उपस्थिताचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत