नेवासा (तालुका प्रतिनिधी) पांढरीपुल येथील शिंगवे तुकाई (ता. नेवासा) हद्दीतील एम.आय.डी.सी. येथे एका खत कंपनीवर कृषी विभागाने कारवाईत विविध कं...
नेवासा (तालुका प्रतिनिधी)
पांढरीपुल येथील शिंगवे तुकाई (ता. नेवासा) हद्दीतील एम.आय.डी.सी. येथे एका खत कंपनीवर कृषी विभागाने कारवाईत विविध कंपन्यांच्या नावाने बनावट पद्धतीने रासायनिक खतांचे पॅकिंग व साठवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत 2,034 गोण्या रासायनिक खतांचा सुमारे 21 लाख 80 हजार 486 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून कंपनीचे मालक किरण चंद्रकांत दौंडकर (रा. केडगाव, जि. अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषी अधिकारी वाल्मिक एकनाथ सुडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. 15 जून रोजी रात्री 9 ते पहाटे रोजी पहाटे 2.30 वाजेपर्यंत शिंगवे तुकाई येथील कृषी गौरव फर्टिलायझर्स प्रा. लि. येथे करण्यात आली.
तपासणीदरम्यान संबंधित कंपनीकडे स्वतःच्या नावाने खत उत्पादन व विक्रीचा परवाना असतानाही इतर विविध कंपन्यांच्या नावाने खतांचे उत्पादन, पॅकिंग व अनधिकृत साठवणूक केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. कृषी विभागाने पंचांसमक्ष खतांचे नमुने घेऊन काही खतांच्या गोण्या जागेवरच सीलबंद केल्या, तर उर्वरित साठा जप्त करण्यात आला.
जप्त करण्यात आलेल्या खतांमध्ये विविध कंपन्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या एकूण 2,034 गोण्या असून त्यांची अंदाजे किंमत ₹21,80,486 इतकी आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील बनावट खत व्यवसायावर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या प्रकरणी बी.एन.एस. कलम 318 (4) तसेच रासायनिक खत (नियंत्रण) आदेश 1985 मधील संबंधित तरतुदी आणि आवश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कृषी विभागाच्या पथकाने सोनई पोलिसांच्या मदतीने केली. पुढील तपास पोलीस सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे हे करीत आहेत. या कारवाईमुळे बनावट किंवा अनधिकृत खत उत्पादन व विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच खतांची खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
सदर यशस्वी कामगिरी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे प्र.कृषी विकास अधिकारी विकास काळे, निलेश अभंग, कृषी अधिकारी (पं.स. नेवासा) वाल्मीक सुडके, तालुका कृषी अधिकारी कार्यालय नेवासाचे कृषी अधिकारी सुहास धस, पंचायत समिती पारनेरचे कृषी अधिकारी राहुल कदम यांच्या संयुक्त पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी पार पाडली.
या धडक मोहिमेसाठी कृषी विभागाचे संचालक (गुण नियंत्रण) सुनील बोरकर , कृषी सहसंचालक बाळासाहेब जेजुरकर, मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक देशमुख, अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, सुधीर शिंदे कृषि विकास अधिकारी अहिल्यानगर यांचे मार्गदर्शन लाभले.
दहा महिन्यापुर्वी नेवासा बु. येथे बनावट खत कारखाना उघडकीस आला होता. पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर हि झालेली कारवाई कायद्याला हि जुमानत नाही.आजहि जिल्ह्यात ठराविक कृषी सेवा केंद्र चालकाकडून सर्राश बनावट खत विकलं जातं आहे.
ज्या पद्धतीने जिल्ह्यातील अवैध धंदे, गर्भलिंगनिदान रॅकेटचा पर्दाफाश जिल्ह्यातील अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केला असून त्याच पद्धतीने जिल्हा पोलिस अधीक्षक एम. सुदर्शन, नगर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलुबर्मे ,अप्पर पोलीस अधीक्षक पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, एलसीबीचे जिल्हाप्रमुख संतोष मुटकुळे यांनी बनावट खत कारखाने शोध मोहिम राबवून गंभीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धनंजय पाटील तसेच शेतकरी संघटनेकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत