देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा येथे गोडाऊनचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३० हजार रुपये किमतीच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्याची...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा येथे गोडाऊनचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३० हजार रुपये किमतीच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी किरण उत्तम पठारे (वय २८, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, पठारे हे व्यवसायानिमित्त वापरत असलेले वाहन (क्र. एमएच १७ सीडी ६०८५) गॅरेजला लावून ठेवले होते. वाहनातील एक्साईड कंपनीच्या १५० अँपिअर क्षमतेच्या दोन बॅटऱ्या काढून ते घरी घेऊन आले होते. २० ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ९.३० वाजता त्यांनी त्या बॅटऱ्या देवळाली प्रवरा येथील त्यांच्या स्टोअर रूममध्ये ठेवल्या.
त्यानंतर रात्री सुमारे १० वाजता स्टोअर रूमला कुलूप लावून ते घरी गेले. २१ ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे ४ वाजता त्यांचे वडील झोपेतून उठले असता स्टोअर रूमचे कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा असल्याचे निदर्शनास आले. पाहणी केली असता स्टोअर रूममध्ये ठेवलेल्या दोन्ही बॅटऱ्या गायब असल्याचे आढळून आले.
परिसरात शोध घेतल्यानंतरही बॅटऱ्या मिळून न आल्याने अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून त्या चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या दोन बॅटऱ्यांची एकूण किंमत ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत