देवळाली प्रवरा(वेबटीम) सन २०२७ मध्ये होणारा १८० वा सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह देवळाली प्रवरा पंचक्रोशीला मिळावा, अशी जोरदार...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
सन २०२७ मध्ये होणारा १८० वा सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह देवळाली प्रवरा पंचक्रोशीला मिळावा, अशी जोरदार मागणी पंचक्रोशीतील गावकरी, भाविक, वारकरी, भजनी मंडळे तसेच विविध धार्मिक व सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे.
देवळाली प्रवरा नगरीला सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. सन १९२७ मध्ये देवळाली प्रवरा येथे ८१ वा सद्गुरू गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह पार पडला होता. या ऐतिहासिक सप्ताहाला सन २०२७ मध्ये तब्बल १०० वर्षे पूर्ण होत आहेत. याच वर्षी १८० वा अखंड हरिनाम सप्ताह होणार असल्याने, शंभर वर्षांनंतर पुन्हा एकदा देवळाली प्रवरा पंचक्रोशीला सप्ताहाचे यजमानपद मिळावे, अशी भावना पंचक्रोशीतील भाविकांमध्ये निर्माण झाली आहे.
या मागणीसाठी गेल्या वर्षी पंचक्रोशीच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. भगवे झेंडे, ढोल-ताशे, टाळ-मृदंगाच्या गजरात मोटारसायकलींचा ताफा सराला बेट येथे पोहोचला होता. यावेळी महंत रामगिरी महाराज तसेच सप्ताह समितीसमोर १८० वा सप्ताह देवळाली प्रवरा पंचक्रोशीला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.
मात्र, चालू वर्षीचा १७९ वा सप्ताह धनगरवाडी येथे होत असल्याने देवळाली प्रवरा पंचक्रोशीतील भाविकांनी आपली मागणी कायम ठेवली आहे. आगामी १८० वा सप्ताह देवळाली प्रवरा पंचक्रोशीला मिळावा, यासाठी विविध माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे.
दरम्यान, सालाबादप्रमाणे सुरू असलेल्या परंपरेनुसार रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी देवळाली प्रवरा पंचक्रोशीच्या वतीने धनगरवाडी येथे आमटी-भाकरीच्या पंगतीचे आयोजन करण्यात आले. पंचक्रोशीतील गावागावांतून चपाती-भाकरी गोळा करण्यात आली, तर आमटीच्या व्यवस्थेसाठी निधी जमा करण्यात आला.
यानंतर पंचक्रोशीतील भाविक घोडे, भगवे झेंडे, सनई, टाळ-मृदंग तसेच ढोल-ताशांच्या गजरात आणि हातात सप्ताहाच्या मागणीचे बॅनर घेऊन धनगरवाडी येथील सप्ताहस्थळी दाखल झाले. सप्ताहस्थळी पोहोचल्यानंतर भाविकांनी महंत रामगिरी महाराजांचे दर्शन घेतले. तसेच, “पुन्हा एकदा देवळाली प्रवरा पंचक्रोशीला सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाचे यजमानपद मिळावे,” अशी मनोभावे मागणी करण्यात आली.
या सप्ताहाच्या मागणीसाठी आयोजित करण्यात आलेल्या आमटी-भाकरीच्या पंगतीच्या कार्यक्रमास माजी आमदार चंद्रशेखर कदम, नगराध्यक्ष सत्यजित कदम, माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम, माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे, नगरसेवक प्रकाश संसारे, अजित चव्हाण, अमोल कदम, सचिन शेटे, माजी नगरसेवक सचिन ढूस, भारत शेटे, सचिन सरोदे, ह.भ.प. राजूआण्णा चव्हाण, ह.भ.प. कांता पाटील कदम, ह.भ.प. बाळासाहेब सोपान मुसमाडे, ह.भ.प. भाऊसाहेब माधव कदम, दत्ता गागरे, ताहराबादचे सरपंच नारायण झावरे, पाराजी सुरसे, रामपूरचे नंदुभाऊ लोखंडे, करजगावचे ह.भ.प. विलास महाराज कोतकर, जातपचे ह.भ.प. नामदेव महाराज शास्त्री, ह.भ.प. किशोर महाराज शेळके यांच्यासह पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते, वारकरी व भाविक सहभागी झाले होते.
शंभर वर्षांपूर्वी देवळाली प्रवरा येथे झालेल्या ८१ व्या सप्ताहाच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा देत, २०२७ मध्ये होणाऱ्या १८० व्या सप्ताहाचे यजमानपद याच पंचक्रोशीला मिळावे, यासाठी भाविकांनी एकजुटीने मागणीचा जागर सुरू ठेवला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत