‘करणी’च्या नावाखाली विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव; धर्म स्वातंत्र्य कायद्यांतर्गत जिल्ह्यातील पहिला गुन्हा राहात्यात दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

‘करणी’च्या नावाखाली विवाहितेवर धर्मांतरासाठी दबाव; धर्म स्वातंत्र्य कायद्यांतर्गत जिल्ह्यातील पहिला गुन्हा राहात्यात दाखल

राहाता(वेबटीम)  आजारपण आणि ‘करणीबाधा’ दूर करण्याचे आमिष दाखवत एका २१ वर्षीय विवाहित महिलेला व तिच्या भावाला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी ...

राहाता(वेबटीम)

 आजारपण आणि ‘करणीबाधा’ दूर करण्याचे आमिष दाखवत एका २१ वर्षीय विवाहित महिलेला व तिच्या भावाला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याचा प्रकार राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे समोर आला आहे. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ तसेच जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अस्तगाव येथील संबंधित विवाहित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये त्या आठव्या महिन्यात गर्भवती असताना पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर त्यांची प्रकृती खालावली होती. दरम्यान, रक्षाबंधनाच्या वेळी त्यांच्या आत्याने पढेगाव येथील ख्रिश्चन समाजातील फादर प्रार्थना केल्यास प्रकृतीत फरक पडेल, असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे.

त्यानंतर २९ ऑगस्टपासून संबंधित व्यक्तीने फिर्यादीच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधून प्रार्थना व मंत्रोच्चार करण्यास सुरुवात केली. १५ सप्टेंबर रोजी ‘तुमच्या वडिलांच्या घरात कोणीतरी करणी केली आहे. त्यासाठी आम्हाला घरी यावे लागेल,’ असे सांगण्यात आले.

त्यानुसार १६ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता संबंधित व्यक्ती अस्तगाव येथील माहेरी आला. त्याने बायबल काढून मोठ्याने प्रार्थना व मंत्रोच्चार सुरू केला. तसेच महिलेच्या भावाच्या हातातील धागा काढण्यास सांगितले. ‘करणीबाधा दूर करण्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागेल,’ असे सांगून धर्मांतरासाठी दबाव व प्रलोभन दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

घरातून मोठ्याने प्रार्थना व मंत्रोच्चाराचा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तीची ओळख तपासण्यात आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुण व पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.

या प्रकरणी नारायण भाऊसाहेब चव्हाण याच्याविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६ मधील कलम ९(१), ९(२) तसेच महाराष्ट्र जादुटोणा प्रतिबंध व निर्मूलन अधिनियम, २०१३ मधील कलम ३(१), ३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत