अहिल्यानगर(वेबटीम) विविध शासकीय सेवा, योजना आणि उपक्रमांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा कार्यालयाच्या वतीने...
अहिल्यानगर(वेबटीम)
विविध शासकीय सेवा, योजना आणि उपक्रमांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा कार्यालयाच्या वतीने ‘माध्यम संवाद’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत दर गुरुवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार असून, प्रत्येक आठवड्यात एका विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना व उपक्रमांची माहिती माध्यम प्रतिनिधींना देण्यात येणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात आज, गुरुवारी झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नगरपरिषदांकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेने विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी आवर्जून उल्लेख केला.
महामहिम राष्ट्रपती महोदया यांच्या हस्ते १७ जुलै २०२५ रोजी स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ अंतर्गत ‘सुपर स्वच्छ लीग’ (SSL) शहरांमध्ये पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या शहरांमध्ये देवळाली प्रवरा नगरपरिषदेला स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, नाशिक विभागातून सुपर स्वच्छ लीग (SSL) शहरांमध्ये स्थान मिळविणारी देवळाली प्रवरा ही एकमेव ULB असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेलाही ISO 9001:2015 मानांकन प्राप्त झाले आहे. १ सप्टेंबर २०२६ रोजी पाणीपुरवठा योजना, पाइपलाइन नेटवर्क, जलशुद्धीकरण केंद्र (Water Treatment Plant), जॅकवेल, पंप हाऊस तसेच वितरण प्रणालीची अंमलबजावणी, बांधकाम, संचालन व देखभाल यासाठीच्या गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीला हे मानांकन मिळाले आहे.
नगरपरिषदेच्या श्री त्र्यंबकराज मोफत वाचनालयालाही ISO 9001:2015 मानांकन प्राप्त झाले आहे. वाचकांसाठी पुस्तके, संदर्भ साहित्य, वर्तमानपत्रे आणि नियतकालिके उपलब्ध करून देत माहिती व संदर्भ सेवा देण्याची सुविधा या वाचनालयात उपलब्ध आहे.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या स्वच्छता, पाणीपुरवठा आणि वाचनालय या क्षेत्रातील कामकाजाला मिळालेली ही मान्यतेची पावती असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ‘माध्यम संवाद’च्या माध्यमातून अशा उल्लेखनीय कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत