देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागास तसेच श्री. त्रिंबकराज मोफत वाचनालयास ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्था...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागास तसेच श्री. त्रिंबकराज मोफत वाचनालयास ISO 9001:2015 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून, नगरपरिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
नगरपरिषदेकडून नागरिकांना दर्जेदार, नियमित आणि गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करण्यासाठी आधुनिक व कार्यक्षम व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. पाणीपुरवठा व्यवस्थेतील गुणवत्ता, नियोजन आणि कार्यक्षमतेची दखल घेत ISO 9001:2015 प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने नगरपरिषदेच्या कामकाजावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
त्याचबरोबर नगरपरिषदेच्या श्री. त्रिंबकराज मोफत वाचनालयालाही ISO 9001:2015 प्रमाणपत्र मिळाले आहे. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक-युवती आणि वाचनप्रेमी नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी वाचनालयामार्फत सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे अध्यक्ष सत्यजित चंद्रशेखर कदम यांच्या दूरदृष्टीने तसेच मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाचनालयाचे ग्रंथपाल संभाजी वाळके यांनी वाचनालय अद्ययावत व संगणकीकृत करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे वाचनालयाच्या सेवांमध्ये अधिक सुसूत्रता आणि आधुनिकता आली आहे.
पाणीपुरवठ्यासारख्या अत्यावश्यक नागरी सुविधेसह ज्ञान आणि वाचनसंस्कृतीच्या क्षेत्रातील या कामगिरीमुळे देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि नागरिककेंद्री प्रशासनाला नवी ओळख मिळाली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, पाणीपुरवठा तसेच ग्रंथालय विभागातील कर्मचारी, वाचनालयाचे कर्मचारी तसेच नागरिकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत