राहात्याच्या रंजना हेकरे यांनी शून्यातून उभे केले स्वतःचे विश्व! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहात्याच्या रंजना हेकरे यांनी शून्यातून उभे केले स्वतःचे विश्व!

    राहाता(वेबटीम)   माहेर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेल्या रंजना हेकरे यांनी विवाहानंतर आलेल्या अने...

  राहाता(वेबटीम)

 माहेर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील एका सामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेल्या रंजना हेकरे यांनी विवाहानंतर आलेल्या अनेक संकटांवर मात करत अक्षरशः शून्यातून स्वतःचे विश्व उभे केले आहे. टेलरिंग, ब्युटी पार्लर आणि विविध ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल असा संघर्षमय प्रवास करत आज त्यांनी राहाता येथे स्वतःचे भोजनालय उभे केले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची दखल घेत नुकताच शिर्डी येथे इच्छापूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

राहाता तालुक्यातील कोरहाळे येथील योगेश हेकरे यांच्याशी रंजना यांचा विवाह झाला. विवाहानंतर संसाराची जबाबदारी सांभाळतानाच स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द त्यांनी मनाशी बाळगली. कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत आपलाही वाटा असावा आणि आई-वडिलांना आपल्या कार्याचा अभिमान वाटावा, हा ध्यास त्यांनी घेतला.

घरातून सुरू झाला टेलरिंग व्यवसाय

सुरुवातीला रंजना यांनी घरातून टेलरिंग व्यवसायाला सुरुवात केली. मात्र अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने आर्थिक अडचणी कायम होत्या. बचत गटातून घेतलेल्या कर्जाची परतफेड करणेही जिकिरीचे ठरत होते. अशा परिस्थितीत अनेकजण खचून गेले असते; मात्र रंजना यांनी हार मानली नाही.

“कुठलेही काम छोटे नसते,” हा विचार मनात ठेवून त्यांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी सातत्याने मेहनत घेतली आणि पुढे जाण्याचा निर्धार कायम ठेवला.

ब्युटी पार्लरनंतर खाद्य व्यवसायाकडे वाटचाल

पुढे रंजना यांनी ब्युटी पार्लर क्षेत्रात पाऊल टाकत स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी आपल्या स्वयंपाकाच्या आवडीला व्यवसायाचे रूप देण्याचा निर्णय घेतला.

विविध ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून त्यांनी आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण केली. कष्ट, सातत्य आणि दर्जेदार भोजनाच्या जोरावर त्यांच्या व्यवसायाला हळूहळू चांगला प्रतिसाद मिळत गेला.

आज राहाता येथे स्वतःचे भोजनालय उभे करून रंजना हेकरे यांनी उद्योग क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

विखे कुटुंबाचे लाभले मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य

रंजना हेकरे यांच्या संघर्षमय आणि यशस्वी प्रवासात विखे कुटुंबाचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या पाठबळामुळे व्यवसायात पुढे जाण्यासाठी रंजना यांना प्रेरणा आणि आत्मविश्वास मिळाला.

आज यशस्वी उद्योजिका

टेलरिंग, ब्युटी पार्लर, विविध ठिकाणी खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि अखेर स्वतःचे भोजनालय असा त्यांचा प्रवास अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर यशाचे शिखर गाठता येते, हे रंजना हेकरे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखविले आहे.

संघर्षातून साकारलेले हे यश केवळ एका महिलेची कहाणी नाही, तर स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक महिलेच्या जिद्दीचे प्रेरणादायी उदाहरण आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत