राहुरी (प्रतिनिधी) राहुरी येथील साई आदर्श मल्टिस्टेट संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी फेडण्यासाठी दिलेला धनादेश वटला नसल्याप्रकरणी न्याय...
राहुरी (प्रतिनिधी)
राहुरी येथील साई आदर्श मल्टिस्टेट संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी फेडण्यासाठी दिलेला धनादेश वटला नसल्याप्रकरणी न्यायालयाने रशीद उस्मान शेख यांना १ लाख ३० हजार रुपये नुकसानभरपाईची शिक्षा सुनावली आहे. ही रक्कम न भरल्यास दोन महिने कारावास भोगावा लागणार आहे.
वरवंडी (ता. राहुरी) येथील फिरोज रशिद शेख यांनी साई आदर्श मल्टिस्टेटच्या शाखेतून ७५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड ठरलेल्या मुदतीत न झाल्याने थकबाकी निर्माण झाली. संस्थेचे कर्मचारी वसुलीसाठी गेले असता, कर्जदाराचे वडील रशीद उस्मान शेख यांनी स्वतःच्या भारतीय स्टेट बँक, अहमदनगर शाखेतील खात्याचा १ लाख ३ हजार रुपयांचा धनादेश संस्थेला दिला. सदर धनादेश वटेल, अशी हमी देत कर्जाची थकबाकी वसूल करण्यासाठी तो स्वीकारण्यास सांगितले.
मात्र, संबंधित धनादेश बँकेत सादर केल्यानंतर तो वटला नाही. त्यामुळे साई आदर्श मल्टिस्टेट संस्थेच्या वतीने परक्राम्य लिखत अधिनियमाच्या कलम १३८ अंतर्गत अहिल्यानगर येथील न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली.
या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान संस्थेच्या वतीने किरण रसाळ यांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच धनादेश, कर्ज व्यवहार आणि संबंधित प्रकरणातील आवश्यक कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली. साक्षीदारांचा जबाब, सादर करण्यात आलेली कागदपत्रे आणि उपलब्ध पुराव्याच्या आधारे न्यायालयाने आरोपी रशीद उस्मान शेख यांना १ लाख ३० हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. ही रक्कम न भरल्यास दोन महिने कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
अहिल्यानगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती प्र. तु. शेजवळ-काळे यांनी हा निकाल दिला.
फिर्यादी साई आदर्श मल्टिस्टेटच्या वतीने न्यायालयीन कामकाज अक्षय दिलीप शेळके यांनी पाहिले. त्यांना ॲड. दिलीप शेळके-पाटील व ॲड. प्रिया काळे यांनी सहाय्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत