राहुरी (तालुका प्रतिनिधी) कनगर येथील कनकावती पतसंस्थेच्या कनगर शाखेतून राहुरी फॅक्टरी येथील श्री. नीलेश अरुण गायकवाड यांनी कर्ज घेतले असून, ...
राहुरी (तालुका प्रतिनिधी)
कनगर येथील कनकावती पतसंस्थेच्या कनगर शाखेतून राहुरी फॅक्टरी येथील श्री. नीलेश अरुण गायकवाड यांनी कर्ज घेतले असून, सदर कर्जाची परतफेड ठरल्याप्रमाणे वेळेत केली नाही. थकबाकी झाली तेव्हा संस्थेचे कर्मचारी वसुलीसाठी गेले असता श्री. नीलेश अरुण गायकवाड यांनी स्वतःच्या खात्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा देवळाली प्रवरा राहुरी, तालुका राहुरी या बँकेचा २३९१२/- रुपयांचा धनादेश देऊन वटण्याची हमी व भरोसा दिला. व कर्जापोटी रक्कम घेऊन जाण्यास सांगितले. परंतु सदरचा धनादेश वटला नाही.
म्हणून फिर्यादी कनकावती पतसंस्थेच्या वतीने अहिल्यानगर येथील न्यायालयात नि.इ.अॅक्ट १३८ नुसार फौजदारी दाखल केली. सदरच्या फिर्यादीची न्यायालयात गुणदोषांवर सुनावणी झाली. सदर सुनावणीच्या वेळी कनकावती पतसंस्थेच्या वतीने शाखाधिकारी शुभम गागरे यांची साक्ष नोंदवण्यात आली व त्यावेळी कनकावती पतसंस्थेच्या वतीने आवश्यक ती योग्य कागदपत्रे न्यायालयात दाखल करण्यात आली.
फिर्यादी संस्थेने दाखल केलेली कागदपत्रे व आलेला पुरावा ग्राह्य धरून आरोपी नीलेश अरुण गायकवाड यास २८ हजार रुपयांची नुकसानभरपाई व ती न भरल्यास एक महिना शिक्षा, सदरची रक्कम निकाल दिनांकापासून दोन महिन्याच्या आत भरण्याबाबत आदेश झालेला आहे.
सदरचा निकाल अहिल्यानगर येथील अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, श्री.रविकिरण सपाटे यांनी दिला आहे. फिर्यादी पतसंस्थेच्या वतीने न्यायालयात फिर्यादीतर्फे ॲड. अक्षय शेळके यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. दिलीप शेळके व ॲड. प्रिया काळे यांनी सहाय्य केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत