श्रीरामपूर(वेबटीम) राहुरी तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनाचा पाठलाग करून वाहन अडविणे, चालकाला धमकावणे तसेच डंपरच्या सहाय्याने जीवघेणा ह...
श्रीरामपूर(वेबटीम)
राहुरी तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनाचा पाठलाग करून वाहन अडविणे, चालकाला धमकावणे तसेच डंपरच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणातील आरोपींवर संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ नुसार वाढीव कारवाई करण्याचा प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
श्रीरामपूर येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाने १७ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रेसनोटनुसार, राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १२०२/२०२६ अन्वये हा प्रकार नोंदविण्यात आला आहे.
दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी राहुरीचे उपविभागीय अधिकारी विनित विक्रांत शिर्के या शासकीय वाहनाने प्रवास करीत असताना पिंपळगाव फुणगी मार्गावर डंपरच्या माध्यमातून त्यांच्या वाहनाचा पाठलाग करण्यात आला. डंपर चालकाने वाहन अडवून फिर्यादींच्या शासकीय वाहनचालकाला धमकावले. तसेच डंपरच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. मात्र, चालकाने प्रसंगावधान राखत वाहन बाजूला काढल्याने अनर्थ टळला.
या घटनेच्या तपासादरम्यान डंपर चालकासह संबंधित आरोपींची नावे निष्पन्न झाली. यामध्ये दीपक ऊर्फ प्रविण बबन लाटे (टोळीप्रमुख), धनराज चौधरी, सतीश रावसाहेब कदम, तुषार चंद्रकांत जाधव, शरद बाळासाहेब भोसले, दत्ता माळी, अर्जुन निकम आदींचा समावेश असल्याचे प्रेसनोटमध्ये नमूद आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित टोळीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हेगारी कृत्ये केल्याचा आरोप आहे. अवैध गौण खनिज चोरी, स्त्रीचा विनयभंग, घरफोडी, जबरी चोरी, जबरीने मालमत्ता हिसकावणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, फौजदारीपात्र गृहअतिक्रमण, हत्यार आदेशाचे उल्लंघन आदी स्वरूपाचे एकूण १५ गुन्हे दाखल असल्याची माहिती प्रेसनोटमध्ये देण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ नुसार संघटित गुन्हेगारीची वाढीव तरतूद लागू करण्यासाठी राहुरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांमार्फत अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी या प्रस्तावाचे अवलोकन केले असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनावर हल्ल्याचा प्रयत्न आणि संघटित गुन्हेगारीच्या आरोपामुळे राहुरी तालुक्यात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत