राहुरी(वेबटीम) निळवंडे कालव्याच्या पाणी आवर्तनाचे नियोजन करताना शेतकऱ्यांच्या शेतीच्या गरजा आणि पिकांची परिस्थिती लक्षात घेऊन पहिले आवर्तन ...
राहुरी(वेबटीम)
निळवंडे कालव्याच्या पाणी आवर्तनाचे नियोजन करताना शेतकऱ्यांच्या शेतीच्या गरजा आणि पिकांची परिस्थिती लक्षात घेऊन पहिले आवर्तन डिसेंबर महिन्यातच १ डिसेंबर रोजी सोडण्यात यावे, अशी मागणी राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार अक्षय कर्डिले यांच्याकडे निवेदन सादर करून पाणी आवर्तनाच्या वेळापत्रकात बदल करण्याची विनंती करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, निळवंडे कालव्याच्या पाण्याचे आवर्तन योग्य वेळी मिळणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या प्रस्तावित असलेल्या आवर्तनाच्या वेळापत्रकानुसार जानेवारी महिन्यात पहिले आवर्तन घेतल्यास पुढील आवर्तनाच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आवश्यक त्या वेळी पाणी उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
याउलट, पहिले आवर्तन डिसेंबर महिन्यात सोडण्यात आल्यास त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात दुसरे आवर्तन घेणे शक्य होईल. त्यामुळे दोन आवर्तनांमध्ये योग्य अंतर राहून शेतकऱ्यांना शेतीच्या सिंचनाचे नियोजन करता येईल. पिकांच्या गरजेनुसार वेळेत पाणी मिळाल्यास शेतीचे नियोजन अधिक चांगल्या पद्धतीने करता येणार आहे.
शेतीसाठी पाण्याचे महत्त्व लक्षात घेता केवळ आवर्तन सोडण्यापेक्षा ते योग्य वेळेत सोडणे अधिक गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित जलसंपदा विभागाने शेतकऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून डिसेंबर महिन्यात पहिले आवर्तन सोडण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी भाजपचे अमोल भनगडे, सोपान गागरे, मारुती नालकर, बबन कोळसे, प्रभाकर कोळसे,सचिन कोळसे, अण्णासाहेब बलमे, विजू बलमे, बापूसाहेब मुसमाडे , विलास गागरे, सर्जेराव घाडगे, बाबासाहेब गाडे , मधुकर गागरे नानासाहेब गागरे , शांताराम सिनारे, विष्णू सिनारे भीमराज हारदे, बाळकृष्ण हारदे,भगनाथ बेलकर, विश्वनाथ शिंगोटे, संतोष सरोदे, दादासाहेब हरिश्चंद्रे, बापूसाहेब मेजर, विकास कोबरणे , सतीश कोबरणे, किरण उंडे आदिंसह शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत