राहुरी ः सचिन शेजुळ आज आपण जे काही आहोत, ते गोर-गरीब जनतेच्या आशीर्वादाने. नगराध्यक्ष, आमदार आणि थेट नामदार म्हणून आपल्याला जी मंत्री प...
राहुरी ः सचिन शेजुळ
आज आपण जे काही आहोत, ते गोर-गरीब जनतेच्या आशीर्वादाने. नगराध्यक्ष, आमदार आणि थेट नामदार म्हणून आपल्याला जी मंत्री पदाची संधी मिळाली, ती देखील याच जनतेच्या आशीर्वादाने. त्यामुळे आपल्या पदाचा वापर हा जनतेच्या हितासाठीच व्हावा, अगदी त्यासाठी कधीही, कुठेही काम करण्याची तयारी असलेले समाजशील नेतृत्व म्हणजे राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे हे होय. ना. तनपुरे हे काल एका लग्न सोहळ्यात व्यस्त असतानाच त्यांच्याजवळ पोहचण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गराड्यातून वाट शोधणार्या ‘त्या’ तरूणावर त्यांची नजर पडली आणि त्यांनी हारतुरे घेवून आलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला सारत त्याच्यापर्यंतचा मार्ग काढला व एका कागदावर स्वाक्षरी करून स्मितहास्यानेच त्याला निरोप दिला. जनतेशी असलेला हा जिव्हाळा पाहून ‘सत्ता आल्यावर पाय जमिनीवर आणि डोकं जागेवर ठेवायचं असतंं’ ही शरदचंद्रजी पवार यांनी दिलेली शिकवण ना. तनपुरेंना मात्र कुटूंबाकडूनच ‘विरासत’ म्हणून मिळाल्याचे पाहायला मिळाले.
राहुरीचे तनपुरे कुटूंब म्हटलं की, राज्यातही सुसंस्कृत आणि सुशिक्षीत कुटूंब म्हणून आवर्जून बोललं जाते. याच घराण्यात माजी खा. प्रसाद तनपुरे यांच्यानंतर राहुरी मतदार संघाच्या विकासाची धुरा उचलण्याचे काम केले ते ना.प्राजक्त तनपुरे यांनी. आजोबा डॉ. बाबुरावदादा तनपुरे यांच्या विचारसरणीचा पगडा असलेले ना. तनपुरे यांचे उच्च शिक्षण अमेरीकेत झाले असले तरी राहणीमान मात्र साधचं, बोलणही मितभाषी, सदैव मदतीसाठी तत्पर, उत्तुंग विचार, शिवाय उच्चशिक्षीत, सौजन्य, सुसंस्कृत, समर्थ राज्यकर्ता आणि विवेकशील राजकारणाचा धनी म्हणून त्यांची ओळख. त्यामुळेच जनता त्यांच्यावर भरभरून प्रेम करते. नगराध्यक्ष, आमदार आणि नामदार पदाची त्यांना मिळालेली जबाबदारी देखील याचीच पावती समजली जाते. राज्याचे उर्जा, नगरविकास आणि तंत्रशिक्षणासारख्या महत्वाच्या खात्यांचे मंत्रीपद मिळाल्यानंत्तरही ना. तनपुरेंचा साधेपणा हा काही कमी झालेला नाही. आजही ते जमिनीवरच आहे.
दोन दिवसांपुर्वी राहुरी शहरातील तोडमल कुटूंबातील एका कार्यकर्त्याच्या मुलीच्या लग्नासाठी ना. तनपुरे हे पोहचताच कार्यकर्त्यांनी एकच गराडा केला. कुणी पुष्पगुच्छ तर कुणी हारतुरे घेवून गर्दी करून लागले. त्यात वधू आणि वराकडील लोकांचाही समावेश होताच. अशाचवेळी एका कोपर्यातून ना. तनपुरे यांच्यापर्यंत आपली अडचण सांगण्यासाठी एक तरूण त्यांच्याकडे निघाला. परंतु, कार्यकर्त्यांमध्ये व्यस्त असलेल्या ना. तनपुरेंपर्यंत पोहचायचे कसे ? या चिंतेत तो असतानाच ना. तनपुरेंची नजर मात्र त्याच्यावर पडली आणि क्षणातच त्या तरूणाच्या चेहर्यावरील हावभाव ओळखतच ते त्याच्यापर्यंत पोहचले. त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याची आपुलकीने विचारपूस केली, त्याची अडचण समजून घेतली आणि एका कागदावर स्वाक्षरी करून आपल्या नेहमीच्या हास्यमुद्रेने त्याला निरोपही दिला. ना. तनपुरेंचा जनतेप्रती असलेला जिव्हाळा मंत्रीपद मिळाल्यानंत्तरही कायम असल्याचे पाहून अनेकांना भुरळ पडली. तर, काहींनी हे संस्कार हे स्व. बाबुरावदादा, माजी खा. प्रसाद तनपुरे आणि आई डॉ. उषाताई तनपुरे यांच्याकडून त्यांना वारसानेच मिळाले असल्याने ते कायम जमीनीवरच राहतील, त्यांचे कार्यकर्ते, जनतेशी असलेली नाळ कधीही तुटणार नाही, त्यामुळेच ना. तनपुरे हे 'सर्वसामान्यांचे मंत्री' असल्याचे जुनेजानते कार्यकर्ते छातीवर हात ठेवून बोलून दाखवत होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत