उंबरे : वेबटीम वै. रघुनाथ महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून भगवंत आदिनाथाच्या चरणी आपले जीवन वेचणारे व समस्त मानव जातीला वारकरी सांप्रदायाच...
उंबरे : वेबटीम
वै. रघुनाथ महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून भगवंत आदिनाथाच्या चरणी आपले जीवन वेचणारे व समस्त मानव जातीला वारकरी सांप्रदायाची शिकवण देणारे थोर संत म्हणजे ह.भ.प. पंढरीनाथ महाराज उंबरेकर होय. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी तळमळीने काम करणार्या पंढरीनाथ महाराजांची काल वृद्धापकाळाने प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची वार्ता उंबरेत येवून धडकताच संपूर्ण गाव शोकसागरात बुडाल्याचे पहायला मिळाले.
वै. ब्रम्हीभूत ह.भ.प. रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या प्रगल्भ विचारांचा आणि धार्मिक परंपरेचा मोठा वारसा लाभलेले ह.भ.प. पंढरीनाथ महाराज उंबरेकर यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारात स्वतःला वाहून घेतले होते. त्यांनी आयुष्यभर वृद्धेश्वर येथे राहूनच भगवान आदिनाथाची सेवा केली. या काळात त्यांनी वै.ह.भ.प. रघुनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यातील सप्ताहातील कीर्तन सेवा तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम साजरे करत वारकरी सांपद्रायाला चांगले दिवस दाखवले. त्यांचे कीर्तन म्हणजे श्रीकृष्णाचे गोकुळातील जीवन आणि भगवंत भक्तीची दिशा दाखवणार्या वारकरी सांप्रदायाचा मार्ग दाखवण्याचे साधन ठरले. तसेच त्यांच्या कीर्तनातून लोक प्रबोधनही तितकेच असायचे. त्यांनी समाजाला धर्माच्या रक्षणाबरोबरच भगवंत भक्तीचे आणि सध्याच्या शिक्षणाचे महत्व पटवून दिले. असे थोर संत असलेले ह.भ.प. पंढरीनाथ महाराजांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता गावातच समजताच उंबरे गावावर मोठी शोककळा पसरली, नव्हे नव्हे तर संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले. वै. रघुनाथ महाराजानंतर उंबरे गावासाठी अभिमान असणारे ह.भ.प. पंढरीनाथ महाराजही आता काळाच्या पडद्याआड गेल्याने गावाला एकप्रकारे पोरकं झाल्याची भावना निर्माण झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत