देवळाली प्रवरा : वेबटीम कोंबडीने बलिदान दिले, मधुशाळेतूनही सर्व नियोजन झाले, आता मोठी मैफिल रंगली, हळूहळू मदिरा पोटात विसावली, चर्च...
देवळाली प्रवरा : वेबटीम
कोंबडीने बलिदान दिले, मधुशाळेतूनही सर्व नियोजन झाले, आता मोठी मैफिल रंगली, हळूहळू मदिरा पोटात विसावली, चर्चेने बैठकीत रंगत आणली, आणि क्षणात एक बातमी येऊन धडकली, लगेचच सर्वांचीच मधूकर्णी उतरली, अन पाहता पाहता पळापळ सुरू झाली, जवळच्या माणसाला कोरोनाची 'ती' वार्ता आली, आणि प्रतिष्ठीतांची रंगेली पार्टी बेरंग झाली....!
याचं झालं असं की, देवळाली प्रवरा पदाधिकाऱ्यांनी लाँकडाऊन काळात कोरोनो संसर्ग रोखण्यासाठी अहोराञ कष्ट घेतले. त्यामुळे शीणभार हलका करण्यासाठी "आषाढ पार्टीचे" नियोजन ठरले. एका राजकीय व्यक्तीच्या फार्महाऊसवर पार्टीची तयारी झाली.ठरल्या प्रमाणे सर्व नियोजन झाले, पार्टीला सुरवातही झाली होती. परंतू त्याच भागात कोरोनो बाधीत रुग्ण सापडल्याची बातमी भ्रमणभाषवरुन समजताच पार्टीसाठी जमलेल्या समाजसेवकामध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले. काहींना त्या रुग्णाचा 'इकडे' वावर असल्याने संसर्गाची भीती वाटू लागली, तर 'काशीहून आणलं आणि वेशीवर सांडल' अशी भावना व्यक्त करत काहींनी आपले परिश्रम जवळच्या लोकांमुळेच वाया गेल्याची भावना व्यक्त करत तोंड कडू केले. या घटनेमुळे सर्वाचा हिरमोड झाला. त्यामुळे सर्वांना ही पार्टी सोडून द्यावी लागली. काही कर्मचारीही त्यात होते, आता उपाययोजना कराव्या लागतील, म्हणून त्यांचीही धावपळ उडाली. त्यामुळे देवळालीतील आषाढ पार्टीचा कोरोनाने बेरंग झाल्याची चर्चा गावात सुरू होती. एकूणच काय तर कोरोनाचा रुग्ण सापडल्याने पार्टीतील ' त्या' लोकांचे श्रम आणि कोंबडीचे बलिदान देखील व्यर्थ गेल्याची गावात चर्चा सुरू होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत