दिल्ली ः वेबटीम कानपूरमध्ये 8 पोलिसांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. विका...
कानपूरमध्ये 8 पोलिसांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड विकास दुबेचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला. विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सच्या पथकाने कानपूर येथे आणले होते. परंतु शुक्रवारी सकाळी पोलिसांची गाडी पलटी झाली. तिथून विकास दुबेनं पोलिसांची बंदूक हिसकावत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान झालेल्या चकमकीत तो ठार झाला.
गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
गुरुवारी, 9 जुलै रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास विकास दुबे याला उज्जैन येथील महाकाळ मंदिरात आत्मसमर्पण केले. मिळालेल्या माहितीनुसार, विकासने मंदिराच्या रक्षकांना आपले नाव सांगितले, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आली. यानंतर उज्जैन पोलिसांनी सुमारे 8 तास त्याची चौकशी केली. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने पोलिसांचे मृतदेह जाळण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते. दरम्यान, कानपूरमध्ये यूपी पोलिसांनी विकास दुबेची पत्नी ऋचा आणि तिच्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले. पोलिसांनी ऋचाला विचारपूस केली. उज्जैनमध्ये विकास दुबेच्या प्रकरणाची नोंद न असल्याने आणि कानपूर एसएसपीच्या विनंतीवरून त्याला संध्याकाळीच तिथे पोहोचलेल्या यूपी पोलिसांच्या एसटीएफच्या पथकाकडे सोपविण्यात आले.यानंतर एसटीएफची टीम मोठा ताफा घेऊन उज्जैन ते कानपूरकडे रस्ता मार्गे रवाना झाली.मध्यप्रदेशच्या भोपाल, गुना, झाशी आणि त्यानंतर उत्तरप्रदेश मधील रस्त्यांवर मोठा फौजफाटा होता.ज्या गाडीत विकास दुबे होता त्या गाडीच्या 10-12 किमीच्या अंतरावर कोणत्याही वाहनाला येण्याची परवानगी नव्हती.जवळपास 50 पेक्षा अधिक पोलिस विकास दुबेसोबत होते. एमपी ते यूपी या पूर्ण रस्त्यावर शेकडो पोलिस उपस्थित होते.शुक्रवारी, 10 जुलै रोजी पहाटे साडेसहा वाजता विकास दुबे यांना घेऊन जाणारी एसटीएफची टीम कानपूर हद्दीत आली.संध्याकाळी 6.25 च्या सुमारास विकास दुबेला घेऊन जाणारे एसटीएफचे वाहन रस्त्यावर पटली झाले.यादरम्यान त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, सोबत पोलिसांची बंदूक ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी पोलिसांशी त्याची चकमक झाली. त्यात तो मारला गेला. या चकमकीत दोन पोलिसही जखमी झाले.जखमी अवस्थेत त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथं सकाळी 7.45 च्या सुमारास विकास दुबेला मृत घोषित करण्यात आलं.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत