मुंबई ः वेबटीम सरकार पाडणार... सरकार पाडणार हे रोज रोज कशाला बोलून दाखवता. आमचं चॅलेंज आहे, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच; असं ...
मुंबई ः वेबटीम
सरकार पाडणार... सरकार पाडणार हे रोज रोज कशाला बोलून दाखवता. आमचं चॅलेंज आहे, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाच; असं आव्हानच शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिलं. तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर त्याविरोधात ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला राज्यातील जनतेसमोर लोटांगण घालायला लावू, असा इशाराही त्यांनी दिला. प्रत्येकाच्या पायाखाली सतरंजी असते आणि कुणाला तरी ही सतरंजी खेचता येत असते, हे लक्षात ठेवा, असा इशारा देतानाच लोकशाही अस्थिर करू पाहणाऱ्यांना आता आणीबाणीवर बोलण्याचा आणि प्रवचन झोडण्याचा अधिकार राहिला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.मध्यप्रदेशापाठोपाठ राजस्थानमध्येही भाजपने सरकार पाडण्यास सुरुवात केली असून महाराष्ट्रातही ऑक्टोबरमध्ये सरकार पाडण्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपला राज्यातलं सरकार पाडण्याचं थेट आव्हानच दिलं. काही लोक मुहूर्त काढून बसले आहेत. काही कुडमुडे जोशी आहेत त्यांच्याकडे. मध्येच असं काही तरी सरकार पडणार असल्याचं बोलत असतात. बरं त्यांचा हा मुहूर्त साडेतीन मुहुर्तांपैकी एक नाहीये. त्यांनी जर मुहूर्त काढला असेल तर आमचीही गटारी आहेच की. आम्ही कोकणातील लोक आहोत, गटारी कशी असते दाखवून देऊ. हे महाराष्ट्र आहे. हे काही गोवा आणि मध्यप्रदेश नाही. तुमचं हे ऑपरेशन कमळ, लोट्स इथे चालणार नाही. तुम्हाला जनतेसमोर लोटांगण घालायला लावू. तुमचं ऑपरेशन लोट्स असेल तर आम्ही ऑपरेशन लोटांगण सुरू करून तुम्हाला धडा शिकवू. मग रोज सतत पाच वर्षे तुम्हाला मुहूर्तच काढावा लागेल, असं सांगतानाच रोज रोज सरकार पडणार सरकार पडणार काय सांगता? सरकार पाडायचं ना? मग पाडाच. हे माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे. तुमच्या राजकीय जीवनाचं ते जर उद्दिष्टंच असेल तर त्याला कोण काय करणार? असं राऊत म्हणाले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत