राहुरी : वेबटीम डॉ तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह सुभाष पाटील व व्हाय चेअरमन शामराव निमसे यांचे खासदार सुजय विखे यांन...
राहुरी : वेबटीम
डॉ तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उदयसिंह सुभाष पाटील व व्हाय चेअरमन शामराव निमसे यांचे खासदार सुजय विखे यांनी राजीनामे घेतल्यानंतर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान, नूतन चेअरमन निवडताना एकीकडे दोन पिढ्या निष्ठेने काम केलेले काही लोक आहेत तर दुसरीकडे नात्यातील लोक समोर उभे आहेत, त्यामुळे विखे कुटुंब मोठ्या धर्म संकटात सापडले असून ते काय निर्णय घेतात ? याकडे तालुक्याचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राहुरीचा तनपुरे कारखाना माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. उदयसिंह पाटील यांनी चार वर्षे कारभार हकल्यानंतर आता शेवटच्या वर्षी खासदार सुजय विखे यांनी त्यांचा राजीनामा घेतला आहे. त्यामुळे आता नवीन चेअरमन कोण होणार ? याविषयी तालुक्यात चर्चा सुरू आहे. . आता नुतन चेअरमन पदासाठी जेष्ठ संचालक सुरसिंगराव पवार, केशवराव कोळसे, मच्छिंद्र तांबे, उत्तमराव आढाव, शामराव निमसे, भारत तारडे, रवींद्र म्हसे, नामेदवराव ढोकणे, शिवाजी सयाजी गाडे, विजयराव डौले यांची नावे चर्चेत आहेत. या नावात राधाकृष्ण विखे पाटील यांचे व्याही नामदेवराव ढोकणे यांचे नाव आघाडीवर आहे. स्वतः खासदार सुजय विखे पाटील त्यांच्यासाठी आग्रही आहेत, त्यांच्या सोयीसाठी उदय पाटील यांचा राजीनामा घेतल्याचे आता लपून राहिले नाही. मात्र, याचे पडसाद उमटणे सुरू झाले आहे. कालच्या मिटींगला अनेक संचालकांनी आपली भूमिका मांडण्याचे ठरविले होते, मात्र ऐनवेळी एकमेकांकडे पाहत कुणीही तोंड उघडले नाही, विखेनी ठरवलं म्हणजे ते करणारच, त्यामुळे विरोध करूनही फायदा नाही, मग आपलं गप्प राहिलेले बरे, अशी भूमिका काहींनी व्यक्त केली आहे. तर काहींनी मात्र आपल्याला विचारणारच नसले तर येथे थांबायचं कशाला ? असा संताप व्यक्त करत वेगळा निर्णय घेण्याचा पावित्रा घेतला आहे. एकीकडे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, तर दुसरीकडे अगदी जवळचे नातेवाईक आहेत, आशा अवघड प्रसंगी नेमकं करायचं काय ? जरी पाहुणे निवडले तर कार्यकर्ते नाराज होणार आणि संधी दिली नाही तर पाहुणे नाराज होतील, त्यामुळे तीन पिढ्या राजकारणात असलेले विखे पाटील या धर्म संकटात काय निर्णय घेतात ? या कडे लक्ष असणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत