राहूरी : श्रीकांत जाधव गेल्या आठवडाभरापासून के.के.रेंजमुळे राहूरी, पारनेर या तालुक्यामधील काही गावांतील जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्म...
राहूरी : श्रीकांत जाधव
गेल्या आठवडाभरापासून के.के.रेंजमुळे राहूरी, पारनेर या तालुक्यामधील काही गावांतील जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते, या संदर्भात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी चर्चा करण्यासाठी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली.यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील, राहुल पाटील शिंदे हे यावेळी उपस्थित होते.
नवी दिल्ली येथील बैठक संपल्यानंतर खासदार डॉ.सुजय विखे म्हणाले की, हा प्रश्न संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या कानावर घातला आहे. लष्कर प्रमुखांची बोलून या प्रश्नी निर्णय घेणार असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. परंतु या प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारशी पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु राज्य सरकारने आपली प्रतिक्रिया पुन्हा केंद्राला न कळविल्याने याबाबत संभ्रमाची अवस्था निर्माण झालेली आहे.सन १९८० पासून या भागाला रेड झोन घोषित केलेले आहे, याची मुदतही २०२१ रोजी संपणार असल्याचे सांगत हा प्रश्न राज्याच्या अखत्यारित असल्याने महाविकास आघाडीच्या स्तरावरून के.के.रेंजबाबत चर्चा होत असली तरी या संदर्भात मुख्यमंत्री व मुख्य सचिवांनी निर्णय घेणे अपेक्षित असल्याचेही विखे पाटील यांनी सांगितले. जोपर्यंत याबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ देऊ नका आणि शेतकऱ्यांचे भूमिका देखील शासनाने विचारात घेतली पाहिजे असेही या बैठकीत डॉ.विखे पाटील यांनी सांगितले. दरम्यान राज्य सरकारने केंद्राला पत्र व्यवहार केल्यानंतर यासंदर्भात तोडगा निघू शकेल असे आश्वासन देखील संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिल्याची माहिती डॉ. विखे यांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत