उंबरे ग्रामपंचायतीसाठी नव्या वर्षात महासंग्राम रंगणार आहे. त्याची पुर्वतयारी म्हणून प्रत्येक प्रभागात वरीष्ठ नेत्यांकडून तुल्यबळ उमेदवारा...
उंबरे ग्रामपंचायतीसाठी नव्या वर्षात महासंग्राम रंगणार आहे. त्याची पुर्वतयारी म्हणून प्रत्येक प्रभागात वरीष्ठ नेत्यांकडून तुल्यबळ उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. दरम्यान, अनेक इच्छुकांनी देखील निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने भेटी-गाठींना जोर दिल्याने गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.
उंबरे गावची निवडणूक प्रतिष्ठेची व रंगतदार होत असल्याने तालुक्याचे या निवडणुकीकडे लक्ष असते. तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे यांचे गावात मोठे वर्चस्व आहे. त्यामुळे उंबरे ग्रामपंचायतीवर अनेक वर्षापासून आदिनाथ सेवा मंडळांचाच झेंडा आहे. परिणामी, यावेळीही आदिनाथ सेवा मंडळाकडून निवडणूक लढण्यासाठी अनेकांनी आग्रह धरला आहे. याशिवाय तनपुरे कारखान्याचे माजी संचालक सुनिल आडसुरे यांचेही गावात मोठे वजन आहे. प्रत्येक प्रभागात त्यांना मानणारा गट देखील लक्षणीय आहे. त्यांच्याकडुनही प्रभागनिहाय चाचपणी सुरू आहे. तर अनेक इच्छुकांनी त्यांच्याकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याचेही कानावर येत आहे.दरम्यान, तनपुरे कारखान्याचे माजी संचालक साहेबराव दुशिंग यांनी आपला सवता सुभा उभारण्यासाठी कंबर कसली आहे. यासाठी त्यांनी नव्या-जुन्यांचा मेळ घालण्याचे काम सुरू केले आहे. त्यांनी प्रभागनिहाय भेटी-गाठी सुरू करून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. प्रभाग क्रमांक पाच हा त्यांनी विशेष केंद्रीत केला आहे. याशिवाय प्रा.रामकृष्ण ढोकणे, ज्ञानदेव क्षीरसागर नाना खंडू ढोकणे यांच्या नेतृत्वाखालील गाव विकास आघाडीकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.दरम्यान, सध्या वरवर तरी गावात चार पॅनलचे चित्र दिसत असले तरी प्रत्यक्षात शेवटी कोणाची कोणासोबत व कशी युती होणार? अंतिम क्षणी उमेदवारी कुणाला मिळणार ? यासाठी अनेक नाट्यमय घडामोडी घडणार आहेत. याशिवाय तनपुरे कारखान्याचे माजी संचालक नवनाथ ढोकणे, युवानेते राजेंद्र ढोकणे, गोरक्षनाथ दुशिंग,कैलास अडसुरे यांची भूमिकाही गावच्या राजकारणातक महत्वाची ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत