अहमदनगर(वेबटीम) नगर जिल्ह्यातील बनावट डिझेल व नाफ्ता भेसळ रॅकेटचा योग्य दिशेने तपास करून मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी माजी मंत्री...
अहमदनगर(वेबटीम)
नगर जिल्ह्यातील बनावट डिझेल व नाफ्ता भेसळ रॅकेटचा योग्य दिशेने तपास करून मुख्य आरोपीला अटक करावी, या मागणीसाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी आज पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेतली. मात्र त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राजकीय मंत्र्याच्या दबाव असल्यामुळे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार हाती लागत नसल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, माजी आमदार कर्डिलेंचा रोख हा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या दिशेनेच असल्याचे लपून राहिले नसून, खरोखरच मंत्री तनपुरेंचा यात हस्तक्षेप आहे की नाही ? हे तपासातच समजणार आहे.
नगर शहरांमध्ये बनावट डिझेलचा टँकर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पकडण्यात आला होता. या कारवाईला आता पंधरा दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. यासंदर्भात आज कर्डिले यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. तसेच मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी त्यांनी केली. तसे निवेदनही त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिले असून राजकीय वरदहस्त असल्याने खुलेआम बनावट डिझेल विक्री केली जात असल्याचा आरोप केला आहे. केवळ राजकीय दबावापोटी कारवाईस विलंब होत असल्याचेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. राजकीय दबावाला बळी न पडता बनावट डिझेल व नाफ्ता भेसळीचा योग्य व निपक्ष तपास करून मुख्य सूत्रधार व इतर सहआरोपींना त्वरीत अटक करावी, अशी मागणी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत