राहूरी(वेबटीम) अकोले येथील पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे व राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांची चौकशी करून तातडीने...
राहूरी(वेबटीम)
अकोले येथील पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे व राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांची चौकशी करून तातडीने निलंबित करा अशी मागणी राहूरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय मकासरे यांनी पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे.
डॉ.मकासरे यांनी पोलीस महानिरीक्षक यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले की, अकोले पोलीस स्टेशन मध्ये वाहन चालक म्हणून असलेले चंद्रकांत सदाफळ यांचे निलंबन झाले होते.त्यानंतर त्यांच्याकडून पोलीस स्टेशनमधील चुकीच्या कामाची माहिती मिळाली होती. पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्याबद्दल अनेक गोष्टी सदाफळ यांनी उघड करून मला रेकॉर्डिंग पाठविल्या होत्या. पोलीस निरीक्षक जोंधळे व राजूरचे एपीआय नितीन पाटील हप्ते घेऊन वाळूच्या तसेच गोमांस विक्री करणाऱ्याना पाठबळ देत असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते. मांस घेऊन जाणाऱ्या गाडीची माहिती कंट्रोल ऑफिस वरून अकोले पोलीस ठाण्यास मिळाली होती. तशी अकोले पोलीस ठाण्याच्या डायरीत नोंदही असण्याची शक्यता आहे. दरम्यान गोमांस घेऊन जाणारी गाडी चंद्रकांत सदाफळ यांनी पकडली परंतु ती गाडी सोडून देण्यासाठी पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी त्यांच्या मोबाइलवरून २५ ऑक्टोबर २०१९ रोजी रात्री ९.१३ च्या सुमारास चंद्रकांत सदाफळ यांना सांगितले तसेच गाडी सोडून देण्यासाठी पोलीस कर्मचारी कैलास शिपनकर यांनी सदाफळ यांना फोन केला होता. सदर संभाषण व ऐकलेल्या रेकॉर्डिंगवरून पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, एपीआय नितीन पाटील , पोलीस कर्मचारी कैलास शिपनकर व सचिन शिंदे यांची नावे येत असून याप्रकरणी सखोल चौकशी करून सर्वांना निलंबित करावे अशी मागणी डॉ.मकासरे यांनी केली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यातील रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याच्या घटना घडल्या असून त्यात वरिष्ठ अधिकारी अडचणीत आले आहेत.आणि आता गोमांस व वाळू तस्करी करणाऱ्यांना अकोलेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी पाठबळ देत असल्याची तक्रार डॉ.मकासरे यांनी करून त्यांच्यातील संभाषण रेकॉर्डिंग डाटा पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे दिल्याने खळबळ उडाली असून पोलीस महानिरीक्षक काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत