कोपरगाव(अक्षय काळे) कोपरगाव तालुका व शहर पोलीस ठाण्याला सध्या पोलीस निरीक्षक नसल्याने दोन्ही ठिकाणी कोण नवीन अधिकारी येणार याबाबत सर्वांची...
कोपरगाव(अक्षय काळे)
कोपरगाव तालुका व शहर पोलीस ठाण्याला सध्या पोलीस निरीक्षक नसल्याने दोन्ही ठिकाणी कोण नवीन अधिकारी येणार याबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
गोदानदी काठ परिसर असलेले कोपरगाव वाळू तस्करी, गुन्हेगारी , अवैध धंदे, राजकीय वैमनस्यातून वादावादी या प्रकरणामुळे नेहमी चर्चेत असते. कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांची अहमदनगर एलसीबीच्या पोलीस निरीक्षकपदी बदली झाल्याने त्यांच्या जागी कोण नवीन अधिकारी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचीही बदली झाल्याने ही जागा रिक्त असून या खुर्चीवर कोण बसणार याकडे सर्वांच्या नजरा आहे.
कोपरगाव तालुका अथवा शहर पोलीस स्टेशन मिळावे यासाठी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी आपले प्रयत्न सुरू केले आहेत. अनेकांनी वरिष्ठ पातळीवरून फिल्डिंग लावण्यास जोरदारपणे सुरुवात केली आहे.
चोऱ्यांचे वाढते प्रमाण, महिलांच्या छेडछाडी तसेच धूम स्टाइल चोरी हाणामाऱ्या , अवैध धंदे आदी गोष्टींना पायबंद घालण्यासाठी कोपरगाव तालुका व शहर पोलीस ठाण्याला खमक्या पोलीस निरीक्षकांची गरज निर्माण झाली आहे असल्याचे जनतेतून बोलले जात आहे.
कोपरगाव शहरात पोलीस निरीक्षक पदावर गोविंदराव पवार, यादवराव पाटील, जगदीश पाटील, मधुकर औटी, राकेश मानगावकर यासारख्या अनेकांनी आपला कार्यकाळ चांगला गाजवून गुन्हेगारी कमी करत भल्या-भल्याना सरळ केल्याचे अनुभव आहेत. त्याप्रमाणे आता डॅशिंग पोलीस निरीक्षक कोपरगावला मिळेल का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.
*लवकर पोलीस निरीक्षक द्या*
कोपरगाव तालुका पोलीस व शहर पोलीस ठाण्यास पोलीस निरीक्षक नसल्याने सगळा भोंगळा कारभार असून गुन्हेगारी वाढण्यास सुरुवात झाली असल्याने दोन्ही ठिकाणी तातडीने पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी देशभक्ती सेवा मंचचे अध्यक्ष रविंद जगताप यांनी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधिक्षक यांच्याकडे इमेलद्वारे पत्र पाठवून मागणी केली आहे.
*अभय परमार यांच्या नावाची जोरदार चर्चा*
दबंग पोलीस निरीक्षक म्हणून चर्चिले जाणारे अभय परमार यांची संगमनेरवरून नगर कंट्रोलला बदली झाली असून त्यांचे चांगले पोलीस ठाणे मिळावे म्हणून जोरदार प्रयत्न सुरू आहे. कोपरगावसाठी ते येणार असल्याची जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात सुरू आहे.
*एलसीबीतून पत्ता कट झालेले अनेकांचे प्रयत्न सुरू*
अहमदनगर एलसीबी मिळावी संपत शिंदे, नितीन गोकावे, अभय परमार, दौलतराव जाधव यांसह अनेक अधिकारी प्रयत्न करत होते. परंतु सर्व प्रकारचे दबाव झुगारून जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी अनिल कटके यांची एलसीबीच्या पोलीस निरीक्षकपदी वर्णी लावल्याने वरील सर्वांचा पत्ता कट झाला. त्यामुळे 'माल' दार पोलीस ठाणे मिळावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत