राहूरी(वेबटीम) बारागाव नांदूर गावामध्ये वाळू तस्करीच्या वादातून दोन गटामध्ये तुफान हाणामार्या झाल्या. पोलिसांच्या उपस्थितीतच दोन गट एकमेक...
राहूरी(वेबटीम)
बारागाव नांदूर गावामध्ये वाळू तस्करीच्या वादातून दोन गटामध्ये तुफान हाणामार्या झाल्या. पोलिसांच्या उपस्थितीतच दोन गट एकमेकांना भिडल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. तीन वाहनांचा ताफा गावात दाखल केल्यानंतर कर्फ्यू लागू करण्यात आला. राहुरी पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर गावामध्ये वाळू तस्करी फोफावली आहे. पोलिस व महसूल प्रशासनाच्या पाठबळाने अवैध वाळू धंदे करणार्यांना सुगीचे दिवस आले आहेत. प्रशासनालाही न जुमानत एकमेकांवर हल्ले करणार्या दोन्ही गटामुळे बारागाव नांदूर गावातील ग्रामस्थांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. प्रशासन आमच्याच पाठीशी असल्याचे सांगत दोन्ही गट एकमेकांना आवाहन देत होते. महिला पुरूषांसह सुमारे दिडशे ते दोनशे जणांचा जमाव बारागाव नांदूर येथील शिवाजी चौकामध्ये जमा झाला. एकमेकांवर हल्ला करण्यात आला. घटनेची परिस्थिती पाहून सायंकाळी 7 वाजताच गावातील व्यापार्यांनी दुकाने बंद करून घेतली. दरम्यान, याबाबत पोलिस ठाण्यात होत असलेल्या चर्चेनुसार वाळू वाहतुकीसाठी वापरल्या जाणार्या चारचाकी वाहनावरून दोन गटात हाणामार्या झाल्याची माहिती मिळाली आहे. वाहनाच्या व्यवहारातून दोन गटामध्ये वाद झाले. राहुरीत वाद सुरू असताना पोलिसांनी मध्यस्ती केल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी सायंकाळी दोन्ही गटाला शांत केले. परंतु सोमवारी दि. 14 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास पुन्हा दोन गटामध्ये हाणामारी जुंपली. दोन्ही बाजुने महिला पुरूष असा शेकडो जणांचा ताफा जमा झाला. तब्बल तासभरानंतर पोलिसांचा फौजफाटा गावात दाखल झाला. पोलिसांना पाहून जमावाने पळ काढण्यास सुरूवात केली. सायरन वाजवित पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या पथकाला ग्रामस्थांना घरात जाण्याचे आवाहन करण्यात आले. रात्री 12 वाजेपर्यंत तणावात्मक परिस्थिती कायम होती. रात्री उशिरा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पोलिस हवालदार सचिन ताजणे यांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सलीम कादर शेख व दीपक उर्फ रघू ज्ञानेश्वर माळी दोन्ही रा. बारागाव नांदूर ता. राहुरी यांनी गावातील ग्रामपंचायत कार्यालयासमोर वाहनाच्या खरेदी विक्री व्यवहाराच्या वादातून पोलिसांसमोरच एकमेकांशी हाणामारी करताना आढळून आल्याचे सांगितले आहे.
राहुरी पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून याबाबत श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधिक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनात तपास केला जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत