देवळाली प्रवरा(राजेंद्र उंडे) राहुरी तालुक्याची कायदा सुव्यवस्थेची त्रेधा उडाली आहे.पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर क...
देवळाली प्रवरा(राजेंद्र उंडे)
राहुरी तालुक्याची कायदा सुव्यवस्थेची त्रेधा उडाली आहे.पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर काही दिवसातच गुन्हेगारीने डोके वर काढले आहे.पोलिस निरीक्षक गाडे यांची सेवानिवृत्ती जवळ आल्याने गुन्हेगारांसह कोणत्याही पोलिसास दुखवायचे नाही असा पविञा सध्या घेत आहे. तालुक्यात वाळू तस्करी, दुचाकी चोरी, मारहाण व अवैध धंद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. शहरासह ग्रामिण भागामध्ये पोलिसांचा धाक कमी होत असल्याने गुन्हेगारांचे वर्चस्व राहुरी परिसरात वाढल्याचे चित्र आहे.
राहुरी शहरातील नवी पेठ येथील चार ते पाच व्यापार्यांच्या दुकाने फोडत चोरट्यांनी हातसफाई केली. व्यापार्यांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा नेत चोरट्यांचा तपास लावण्याची मागणी केली होती. परंतु महिना उलटूनही पोलिसांनी चोरांचा तपास लावला नाही. त्याउलट शहरासह ग्रामिण भागात चोरट्यांचा उपद्रव वाढत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मुळा व प्रवरा नदी पात्रातून पूर्वी रात्री केली जाणारी वाळू चोरी दिवसाही वाढली आहे. परंतु याकडे पोलिस प्रशासनाने पुर्णपणे कानाडोळा करीत वाळू तस्करांना वाळू चोरीसाठी पाठबळ दिल्याचे चित्र आहे. वाळू तस्करांचा राहुरी परिसरात गोरखधंदा सुरूच असून धंद्यातून पैसा कमवायचा व त्यातून पोलिस प्रशासनाशी हितसंबंध निर्माण करायचे. शहरासह ग्रामिण भागात पोलिस कर्मचारीही वाळू तस्करांच्या गाड्यांवर फिरत असल्याचे दुर्देवी चित्र आहे. वाळू तस्कर व वाळू तस्करांचे हितसंबंध पाहून सर्वसामान्यही अवाक झाले असून वाळू तस्करांची दमबाजी सहन करण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. नदी पात्रालगतच्या शेतकर्यांना वाळू तस्करांचा सर्वाधिक त्रास असून बारागाव नांदूर, डिग्रस, मानोरी, आरडगाव, वळण, कोंढवड यासह प्रवरा पात्रातील सोनगाव, सात्रळ, धानोरे, पाथरे परिसरातील रस्त्यांची चाळण वाळू तस्करांनी केली आहे.
राहुरी परिसरात अवैध धंद्यांमध्ये वाढ झालेली असतानाच दुचाकी चोरट्यांनीही डोके वर काढले आहे. गत आठवड्याभरात साधारण 7 ते 8 दुचाक्या चोरीला गेल्याचे प्रकार घडले आहे. दुचाकी चोरल्यानंतर दोन ते तीन दिवसातच चोरटे दुचाकी मालकाशी संपर्क साधून तडजोड करीत असल्याचे दुर्देवी चित्र आहे. यापूर्वी पोलिस ठाण्यातून पोलिस कर्मचार्यांच्या दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. पोलिसांनाही चोरट्यांशी तडजोड करून दुचाकी सोडवून आणावी लागली होती. त्यामुळे सर्वसामन्य जनता पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी थेट चोरट्यांच्या मागणीनुसार रक्कम अदा करीत चोरीला गेलेली दुचाकी सोडवून आणत असल्याचे चित्र राहुरीत दिसून येत आहे.
यासह शहरासह ग्रामिण भागात मटका जुगाराच्या पेढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अल्पवयीन मुलांसह तरूण, ज्येष्ट नागरीक व महिलांकडून मटका जुगारावर दैनंदिन लाखो रूपयांची उलाढाल केली जात असल्याचे चित्र आहे. अवैध दारू विक्रेत्यांचेही चांगलेच फावले असून ग्रामिण भागामध्ये उघडपणे गावठी दारू बनवून विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे.
शेतकर्यांनाही चोरट्यांचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. शेतमालासह, केबल, वीज पंप आदी साहित्यांची चोरी करून शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड दिला जात आहे. पूर्वीच कोरोना पार्श्वभुमी व अतिवृष्टीने त्रस्त शेतकर्यांना चोरट्यांकडून नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे. पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करूनही तपास होत नसल्याने शेतकरी व व्यापार्यांनी पोलिस ठाण्याची पायरी चढण्यास नकार दिला असल्याचे चित्र आहे.
याप्रमाणे राहुरी तालुक्यात कायदा सुव्यवस्था पायदळी तुडविली जात असून याबाबत जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील व श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांनी लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.
पोलिस उपविभागिय अधिकारी संदिप मिटके यांची डरकाळी पोकळ ठरली?
श्रीरामपूर पोलिस उपविभागिय अधिकारी संदिप मिटके यांनी राहुरीत पत्रकार परिषद घेऊन राहुरी तालुक्यातील सर्व गुन्हेगारीची माहिती घेतली होती. राहुरी तालुक्यातील गुन्हेगारी संपूष्टात आणण्यासाठी विशेष उपाययोजना करू असे आश्वासन उपविभागिय पोलिस अधिकारी मिटके यांनी दिले होते. परंतु त्यांचे आश्वासन हवेतच विरले असून राहुरीतील गुन्हेगारी कमी होण्याऐवजी कमी होण्याऐवजी वाढली आहे.


रोख ठोक लिखाणाबद्दल धन्यवाद !!
उत्तर द्याहटवा