अकोले(विद्याचंद्र सातपुते) तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 23 डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आ...
अकोले(विद्याचंद्र सातपुते)
तालुक्यातील 52 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. 23 डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात होत आहे.अकोले तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडण्यास सुरू झालेला आहे.भाजपचे युवानेते माजी आमदार वैभवराव पिचड यांनी विधानसभेत झालेल्या पराभवानंतर पहिले दोन तीन महिने शांत राहणे पसंद केले.मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखविण्यास सुरुवात केली.तालुक्यातील अनेक प्रश्नांवर त्यांनी आवाज उठविला. आता होऊ घातलेल्या निवडणूका त्यांनी खूप गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे.कारण गाव पातळीवर आपला पाया भक्कम झाला तरच पुढची विधानसभा आपण जिंकू शकतो.असे त्यांना वाटते.
भाजप पक्ष हा पक्ष संघटनेवर भर देत असल्याने माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले मध्ये भारतीय जनता पक्षाने बैठका घेऊन कार्यकर्त्यात उत्साह भरला आहे.प्रथम भाजपची तालुका कार्यकारिणीची घोषणा केली,अनेक तरुणांना त्या मध्ये पक्ष संघटनेची जबाबदारी दिली.त्यानंतर कार्यकर्ता प्रशिक्षण घेतले,नंतर कार्यकर्ता व पदाधिकारी यांची बैठक घेतली,नंतर पक्षाचे महामंत्री पुराणिक यांना बोलवून निवडणूक पद्धतीचे मार्गदर्शन बैठक घेतली .अतिशय शिस्तबद्ध असा कार्यक्रम राबविल्याने भाजप कार्यकर्त्यात आत्मविश्वास वाढला असल्याचे दिसून येत आहे.राजूर येथे माजी आमदार पिचड हे दररोज अनेक गावातील लोकांशी चर्चा करून ग्रामपंचायत आपल्या ताब्यात असणे कसे गरजेचे आहे, याबाबत मार्गदर्शन करताना दिसत आहे. युवकांशी सुसंवाद साधून त्यांना निवडणुकीत संधी देण्याचे सूतोवाच केले.त्यामुळे तरुण वर्ग भाजपकडे आकर्षला जात आहे. तर विधानसभेत निवडणूकीत झालेला विजय ,आपल्या पक्षाची वाढलेली ताकद पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर लढण्याची भाषा सुरुवातीलाच करून आपले ध्येय स्पष्ट केले.तर आपल्यामुळे राष्ट्रवादी विधानसभा जिंकली असून आपणही काही कमी नाही हे दाखविण्यासाठी काँग्रेस , शिवसेना व आर पी आय यांनीही स्वबळाची भाषा वापरली आहे.त्यामुळे या सर्व पक्षात उमेदवारी मिळण्यासाठी रस्सीखेच होताना दिसण्याची शक्यता आहे.असे असले तरी पक्षाचे वरिष्ठ काय निर्णय घेतात यावर या निवडणुकीत आघाडी होते की,स्वबळावर लढताना दिसतील हे लवकरच समजेल.एकमात्र महाविकास आघाडी झाली तर अनेकांना नाराज व्हावे लागणार आहे,ज्यांच्याशी पटत नाही अशा उमेदवाराचा प्रचार करावा लागणार आहे. तर काही अपक्ष निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही .अर्थात हे चित्र 23 डिसेंबर ते माघारीची तारीख 4 जानेवारी या कालावधीत समजणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत स्वतःचे अस्तित्व दाखविण्याची संधी असते,ती आघाडी झाल्यावर दाखविणे शक्य होणार नाही. तसे पाहिले तर या निवडणुकीत कोणाची ताकद किती आहे हे समजून येते.मात्र आपल्या पक्षाची ताकद कमी दिसायला नको म्हणून आघाडीला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.तसेच आपल्या पक्षाची ताकद दाखवून द्यायची असेल तर स्वबळावर निवडणूक लढवावी लागेल,तरच आपण किती पाण्यात आहोत हे समजून येणार आहे.अन्यथा एकमेकांचा आधार घेऊन आपल्या पक्षाची ताकद कमी होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही.भाजपने आपले उमेदवार जवळपास निश्चित केले असल्याचे समजते व त्यांना छुप्या पध्दतीने कामाला सुरुवात केल्याची चर्चा आहे.ह ग्रामपंचायत निवडणूक त्यांनी खूप मनावर घेतली असून
विधानसभेच्या निवडणूकीत झालेल्या चूका यावेळी होणार नाही याची काळजी घेताना दिसत आहे. तसे पाहिले तर ग्रामपंचायत निवडणूक ही उमेदवार कोण आहे हे पाहून मतदार हा मतदान करीत असतो.त्यामुळे सर्व पक्ष हे चांगले उमेदवार शोधीत आहेत. एका एका वार्डात अनेक इच्छुक अनेक उमेदवार असल्याने कोणाला उभे करायचे व कोणाचा रोष ओढवून घ्यायचा ही डोके दुःखी ठरणार आहे.
आता तालुक्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी निवडणूक होते की सर्व पक्ष आपली ताकद आजमिविण्यासाठी स्वबळावर एकमेकाच्या विरुद्ध उभे राहतात हे लवकरच समजेल. एक मात्र नक्की की,भाजपच्या विरुद्ध कोणीही असो, भाजप मात्र स्वबळावर सर्व निवडणुका लढविणार आहे.व भाजपला तोंड कसे द्यायचे हे अजून इतर पक्षांना ठरवायचे आहे.त्यांचे एकमत होण्यास किती वेळ जातो याबाबत त्यांच्यात संभ्रमवस्था आहे.स्वबळाची भाषा भाजप वगळून किती जणांना झेपेल हे लवकरच कळणार आहे.ह्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका मोठया प्रमाणात बिगर आदिवासी भागातील व सधन गावातील असून ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून सर्वांनी मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
बिनविरोध निवडणुका ह्या होतील की नाही उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या माघारीच्या दिवशी समजणार आहे. या माघारीसाठी सर्वच पक्षांना मोठी कसरत करावी लागणार आहे.मतदार मात्र अंदाज बांधण्यात गुंतला असून उमेदवार कोण आहे यावरच या निवडणुकीचे व पक्षाचे भवितव्य अवलंबून आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत