म्हणूनच कोल्हे गट चवताळलेला आहे- नगराध्यक्ष वहाडणे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

म्हणूनच कोल्हे गट चवताळलेला आहे- नगराध्यक्ष वहाडणे

  कोपरगाव प्रतिनिधी तुम्हीच सांगता कि प्रशासन व लोकप्रतिनिधी ही रथाची दोन चाके आहेत, पण आमदारपद  असतांना हे भान का नव्हते? आताचे आमदार आशुतो...

 कोपरगाव प्रतिनिधी

तुम्हीच सांगता कि प्रशासन व लोकप्रतिनिधी ही रथाची दोन चाके आहेत, पण आमदारपद  असतांना हे भान का नव्हते? आताचे आमदार आशुतोषजी काळे यांना भान असल्यानेच त्यांच्या व माझ्यात विकासासाठी समन्वय आहे, मुख्याधिकारी व अधिकाऱ्यांचीही साथ आहे त्यामुळे तुमचे पोट का दुखते? मी नगराध्यक्ष झाल्यापासून (तुम्ही निधी मिळू दिलेला नसूनही) जवळपास १८ कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत, तुमच्या एकाही नगराध्यक्षाने ४ वर्षात इतकी कामे केलेली नाहीत हे आत्मविश्वासाने सांगतो. जास्त विकासकामे  तर कोल्हे गटाच्या प्रभागात झालेली आहेत. पण आता प्रमुख रस्त्यांची कामे झाली तर मला  श्रेय मिळेल म्हणूनच तुम्ही किळसवाणे अडथळे आणत असल्याचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी म्हंटले आहे.

वहाडणे यांनी म्हंटले की, एकटा तुम्हाला उत्तर द्यायला समर्थ आहे. तुम्ही मात्र बदनाम कोंडाळे जमवून मला घेरण्याचा प्रयत्न करत आहात. दिड कोटी रुपयांचे रस्त्याचे काम मिळणार असलेल्या एका ठेकेदाराचे बंधू तर माजी आ.कोल्हे साहेबांच्या कन्येच्या नाशिक येथील शिक्षण संस्थेत विश्वस्त होते, त्याच ठेकेदाराने टाकळी फाटा ते कोल्हे वस्ती रस्त्याचे दर्जेदार डांबरीकरण केलेले असतांनाही तो ठेकेदार माझ्याजवळचा कसा? नामंजूर केलेल्या कामापैकी जास्त कामे ही कोल्हे गटाच्याच प्रभागातील आहेत, तरी कामे नामंजूर केली गेली.

  

    ४२ कोटीच्या पाणी योजनेतीलच पाणी तुम्ही पित आहात.या पाणी योजनेच्या ठेकेदाराला  पैशासाठी सतत फोन करणारेच तुमच्याभोवती बसलेत. निसर्ग कन्सल्टन्सीला तुम्हीच नियमबाह्य हाकलल्याने नगरपरिषदेला दिड कोटीचा भुर्दंड पडणार आहे. शिवाय कार्यदेशा व्यतिरिक्त असलेली कामे आम्हीच पूर्ण करत आहोत,तुम्ही तर टक्केवारी घेऊन मोकळे झाले. याला जबाबदार कोण? येसगावच्या पाणी चोर नेत्यांनी ज्यांना पत्रकार परिषदेत बोलायला भाग पाडले, त्यांचेही अनेक पराक्रम मी जाहीर करणारच आहे. बंद पाईप लाईनने पाणी आणण्याचा शहाजोग सल्ला देणाऱ्यांना मी विचारतो कि, बंद पाईपलाईनने पाणी आणण्याचा डी पी आर तुमच्याच काळात तर तयार होता, पण तो कुणाच्या दमबाजीमुळे बाजूला ठेवला? श्री.पराग संधान यांनी सांगावे कि दोन महिन्यांपूर्वी कोपरगाव-येवला हायवेला कुणी जमीन घेतली? समृद्धी महामार्गालगत अनेक एकर जमीन कुणी कुणाच्या काळ्या पैशावर घेतली? मोक्यावरील जमिनी स्वस्तात घ्यायच्या व रुंदीकरण होतांना चार पट पैसे कमवायचे हे तर शाही परिवाराचे धंदे. कोट्यावधी वाटूनही तुम्हाला जनतेने नाकारलेले आहे. जरा गप्प बसा. धारणगाव रस्त्याचेही एस्टीमेटही तयार आहे, इंदिरा पथ रहिवाशांच्या तक्रारींमुळे कामाचे नियोजन केलेले नाही. हद्दवाढ झालेल्या भागातही काही कामे केली आहेत-सुरू आहेत. त्या भागासाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

            तुमचे नगराध्यक्ष असतांनाच  धारणगाव रोडचे १ कोटी ४ लाख रु. चे एस्टीमेट झाले. तांत्रिक मंजुरीही एम जे पी कडूनच आणली.  तरीही आज एम जे पी व आमच्या नांवाने आरडाओरड सुरू आहे. त्या कामाचे एस्टीमेट १ कोटी होते तरी प्रत्यक्षात फक्त ६५ लाख रुपयेच बिल अदा करण्यात आलेले आहे. आम्ही रस्त्यांचे इस्टीमेट मुद्दाम वाढविलेले आहे अशा बोंबा मारणाऱ्याना मी सांगतो कि, इस्टीमेट कितीही रकमचे असले तरी प्रत्यक्ष कामाचे मोजमाप होऊनच बिल दिले जाते. अंदाजपत्रक म्हणजे पेमेंट नव्हे. मी नगराध्यक्ष झाल्यानंतर माजी आमदारांनी एकही दमडी निधी आणलेला नाही. उलट निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पळविला, मला अंधारात ठेवून २ वर्षांपूर्वी घाईघाईने भूमिपूजन केले त्यातील ३ कामे अजूनही झालेली नाहीत, लोक मात्र आम्हाला जाब विचारणार. तुम्ही इमारतींसाठी निधी आणला असेल तर ते उपकार नाहीत. तुम्ही आमदार असतांना भाजपाची राज्यात सत्ता असूनही विस्थापितांसाठी तुम्ही का दिवे लावले नाहीत. डोके ठिकाणावर असते तर संगमनेर व सिन्नरसारखे गाळे बस स्टॅण्डभोवती करता आले असते कि नाही? 

सातभाई नावाचे प्रसिद्ध विद्वान तर असे म्हणतात कि ४७० खोका शॉप होऊ शकतील अशी योजना तयार आहे, पण वहाडणे हे काहीच करत नाहीत. श्री.सातभाई १००% खोटे सांगून गैरसमज पसरवत आहेत, खोका शॉपची योजना तयार होती तर तुम्ही सत्तेत असतांना झोपले होते का? कोल्हे यांना खुश करण्यासाठी किती खोटे बोलणार? आम्ही खोका शॉपसाठी नगर रचना विभागाला ८ जागा सुचविल्या होत्या, पण त्यापैकी फक्त बाजारतळ येथेच मंजुरी मिळणार आहे. काँग्रेस कमिटी जवळ शॉपिंग किंवा खोका शॉपसाठी परवानगी प्रतीक्षेत आहे.

           तुमच्या मांडीला मांडी लावून माझ्या नांवाने खडे फोडणारा अतिक्रमण सम्राट बसलेला असतांना, माझ्या काळात अतिक्रमणे वाढली असा आरोप करत आहेत. तुमच्या अतिक्रमनामुळेच शहरात अतिक्रमणे वाढत आहेत. अतिक्रमण काढून टाका असे मी अधिकाऱ्यांना लेखी दिले आहे. पण आधी बड्यांची अतिक्रमणे काढा मगच इतरांची काढा असे सगळेच जण म्हणतात. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जातो. तुम्हाला शहराची काळजी असेल तर आधी स्वतःची अतिक्रमणे काढा. बाहेर गावाहून आलेल्या अधिकाऱ्यांना व आम्हाला दोष देऊ नका. मी अतिक्रमणे हटविली पाहिजेत म्हणजे तुम्हाला माझ्याविरुद्ध बोंब मारता यावी हाच तुमचा दुष्ट हेतू आहे. शहरात मोठी गुंतवणुक करून व्‍यवसाय करणा-यांच्‍या दुकानासमोर कुणीही बसणे योग्‍य नाही. 

            तीन दिवसांनंतर मी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन क्रीडांगणाचे आरक्षण, भ्रष्टाचार, ठेकेदार- नगरसेवक संबंध तसेच काही महान नगरसेवकांचे पराक्रम नावासह जनतेसमोर मांडणार आहे. कारण नांवे घेऊन बोला असे कोल्हे गटाचेच म्हणणे आहे.

          कोपरगाव नगरपरिषदेने स्वच्छता-आरोग्य यात केलेले उत्कृष्ट काम तरी मान्य आहे की नाही? नगरसेवकांच्या मागणीनुसारच कामे केली आहेत-होत आहेत. तुमचे नगरसेवक बोलतांना कामांबाबत माझ्याकडे समाधान व्यक्त करतात, पण तुमचा दबाव असल्याने जाहीरपणे बोलू शकत नाहीत असे वहाडणे यांनी म्हंटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत