राहुरी : वेबटीम पंचायत समिती ,राहुरी येथील सभागृहात विराज विवेकानंद खामकर या विद्यार्थ्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्या...
राहुरी : वेबटीम
पंचायत समिती ,राहुरी येथील सभागृहात विराज विवेकानंद खामकर या विद्यार्थ्याचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय अंकनाद पाढे पाठांतर स्पर्धेत बालगटातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावल्याबाबत हा सत्कार करण्यात आला. इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या विराजने या स्पर्धेत पंचावन्न पर्यंत पाढे म्हणून दाखवले.
यावेळी राहुरी पंचायत समितीच्या सभापती बेबीताई सोडनर , उपसभापती प्रदीप पवार , पंचायत समिती माजी सभापती मनीषाताई ओहोळ, माजी उपसभापती बाळासाहेब लटके पाटील, माजी उपसभापती रवींद्र आढाव,सुरेश निमसे, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, सहाय्यक गटविकास अधिकारी परदेशी, गटशिक्षणाधिकारी सुनील सूर्यवंशी आदी उपस्थित होते. स्व.डॉ.दादासाहेब तनुपरे सभागृहात हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
विराज विवेकानंद खामकर हा विद्यार्थी सध्या जि. प.प्राथमिक शाळा, तुळापूर ता.राहुरी येथे इयत्ता पहिली मध्ये शिकत आहे. राज्य मराठी विकास संस्था,महाराष्ट्र शासन, व मॅप एपिक कम्युनिकेशन प्रा.लि. पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून बालगटात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे. विराज खामकर या विद्यार्थ्यांने त्याच्या जि. प. शाळेचे तथा राहुरी तालुक्याचे व अहमदनगर जि.प.चे नाव राज्यात गौरविले आहे. या विद्यार्थ्याचे हे यश म्हणजे जि. प.शाळा विविध नाविन्यपूर्ण उपक्रमात व स्पेर्धेत सहभागी होतात,यश मिळवतात. हेच पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित करणारे आहे.
या सत्काराचे वेळी विराज सोबतच त्याचे पालक विवेकानंद खामकर, शिक्षक व मुख्याध्यापक जगन्नाथ भांगरे,सोनगाव चे केंद्रप्रमुख शंकर गाडेकर ,कोल्हार बिट विस्तार अधिकारी अनिता निऱ्हाळी यांचे ही अभिनंदन करण्यात आले.
अहमदनगर जि.प.शाळेत शिकणारा हा विद्यार्थी म्हणजे आपला सर्वांचा अभिमान आहे.असे गुणवान विद्यार्थी घडविण्यासाठी सर्व शिक्षकांनी व शाळेने सतत प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन गटविकास अधिकारी गोविंद खामकर यांनी केले.
लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्या तरी शिक्षणात खंड पडू नये, यासाठी जि.प.शाळेतील विद्यार्थी हे विविध स्पर्धा आणि ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी होत असतात. विविध नाविन्यपूर्ण उपक्रमात जि.प.शाळा, शिक्षक व विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी शासनाने अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत.अशा उपक्रमात सर्व शाळांनी सहभाग घ्यावा असे आवाहन राहुरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत